पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे १३

येऊन करावे. असे केल्याने भीतीचे कारण राहणार नाही. 'चार टोणपे शास्त्री या लोकांना फार तर जातीबाहेर ठेवतील, पण एकट्या दुकटयाला बहिष्काराची भीती असते. मोठा समुदाय झाला की त्यास भीती नाही. त्याचीच जात होते. मग बहिष्काराचे त्याला भय कसले ?' असे सांगून नंतर या पत्रात त्यांनी धर्मसुधारणेची अनेक कलमे दिली आहेत; 'सर्वांनी ईश्वराचे भजन अंतःकरणपूर्वक करावे, जे कर्म करणे ते स्वभाषेत अर्थ समजेल असे करावे, भजन, पूजन, संस्कार सर्व ज्याचे त्याचे भाषेत करावे. प्रत्येकास आपले विचाराप्रमाणे आचार करण्याची व बोलण्या-लिहिण्याची मोकळीक असावी. त्यास प्रतिबंध असू नये. स्त्रीपुरुषांचे अधिकार धर्मसंबंधी कामात व संसारात एकसारखे असावेत. म्हणजे जे रयतेच्या हिताचे फायदे आहेत ते सरकारशी भांडून घेत जावे, विद्यावृद्धीकरता सर्वांनी मेहनत करावी, शेवटचे कलम असे आहे की, सत्याने सर्वांशी चालावे."
 हा लोकहितवादीप्रणीत 'धर्म' पाहिला तर प्राचीन काळचा व्यासभीष्मश्रीकृष्णप्रणीत धर्म व हा धर्म यांत काही फरक नाही. असे आपल्या ध्यानात येईल. धर्म हा समाजाच्या हितासाठी आहे व तो बुद्धिप्रणीत असला पाहिजे हा आग्रह दोन्हीकडे सारखाच आहे. या धर्माचं स्वरूप अत्यंत व्यापक असे आहे. मानवी जीवनाचे कोणतेही अंग त्याच्या दृष्टीतून सुटलेले नाही. स्वभाषेचा, देशाचा अभिमान, स्त्रीपुरुषसमता, गुणनिष्ठ जातिभेद, रयतेचे सरकारहून श्रेष्ठत्व इ. अर्वाचीन काळातील राजकारण, समाजकारण या विषयांतील सर्व नवे विचार त्यात आले आहेत, हे पाहिल्यावर हिंदुलोकांचे या धर्मानेच कल्याण होईल, या लोकहितवादींच्या म्हणण्यात मुळीच अतिशयोक्ती नाही हे कोणालाही पटेल.
 अज्ञान, दुरभिमान, शब्दप्रामाण्य, कर्मकांड, धर्माविषयी विपरीत कल्पना या हिंदुसमाजाच्या व्याधींचा विचार झाल्यावर लोकहितवादींनी त्यावर उपाय म्हणून या धर्माची स्थापना करण्याचा प्रयत्न आरंभिला होता. त्या धर्मात वर म्हटल्याप्रमाणे विद्योपासना, बुद्धिप्रामाण्य, राष्ट्राभिमान, समता, व्यक्तिस्वातंत्र्य या अर्वाचीन समाजरचनेच्या सर्वच मूलभूत तत्त्वांचा अंतर्भाव झालेला आहे. लोकहितवादींच्या बुद्धीचा व्याप केवढा मोठा होता, समाजाच्या उत्कर्षापकर्षाचा ते कसा सर्वांगीण विचार करीत असत. एकही समाजांग त्यांच्या दृष्टीतून कसे सुटले नव्हते. हे यावरून दिसून येईल. आज शंभर वर्षांनी ज्या ज्या सुधारणा आपल्या देशात व्हाव्या असे आपण म्हणतो, त्या सर्वांचे प्रतिपादन