पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२ : शतपत्रे

अगदी आंधळे आहेत. पुरुषांत जे लाचखाऊ, चोर, इंद्रियभ्रष्ट, पण त्यांचे सोवळे सर्वांहून अधिक, जेवताना बोलत नाहीत, त्यांना लोक मान देतात. त्यांचे आचरण पहात नाहीत.' (पत्र क्र. ५८) यावरून लोकहितवादी रीत, चाल, आचार कशाला म्हणतात ते ध्यानात येईल. नीती, परोपकार, भूतदया, क्षमा, शांती, ज्ञानदान, मनोनिग्रह याला ते खरा धर्म मानतात. "कोणी म्हणतो की, मी कार्तिकमासी निरांजने दिली, कोणी म्हणतो की, मी वैशाखात मडकी दिली, आवळे दिले. हा धर्म कशाचा? हा मूर्खपणा आहे." मग धर्म कोणता? "आंधळ्यास जेवावयास घातले काय ? दीन, गरिबांना (ब्राह्मणांस नव्हे) वस्त्रे दिली काय ? अज्ञानांस ज्ञानी केले काय ? दुर्जनांस सुजन केले काय ? कोणता परोपकार आपले लोकांमध्ये त्यांनी केला ? धर्म त्यावरून ठरतो." (पत्र क्र. ३५)
 व्रतवैकल्ये :- व्रतवैकल्यांचा, उपास-तापासांचा, मंत्रतंत्राचा हा धर्म पुराणांनी प्रसृत केला असा लोकहितवादींचा आक्षेप आहे. 'अज्ञान फार वाढले व त्यांस साधन मुख्य पुराणे आणि महात्म्ये लिहावयास हाच पंडितांचा रोजगार होता' असे ते म्हणतात. 'कोणी कावेरीमाहात्म्य, कोणी नाशिकमाहात्म्य, कोणी करवीर माहात्म्य, कोणी गणपतिपुराण अशी लिहिली, प्रत्येकात हेतू हाच की, ब्राह्मणास पैसा मिळण्याची तजवीज पहावी. वर्षात तीनशे साठ दिवस व त्याहून अधिक व्रते आहेत. पुराणात नित्यकर्म पाहिले तर सगळा एक दिवस पुरणार नाही. इतके धर्म त्यात आहेत पण त्यात काही नीती आहे असेही नाही. कासोटा कसा घालावा, गंध कसे लावावे, शौचास अमुक कोस जावे, हेच फार आहे. लोकांचे सुख व ज्ञान वाढवावयाची त्यात एकदेखील गोष्ट नाही. मूर्खपणा वाढवावयाच्या गोष्टी आहेत. अज्ञान्यांस अजरामर करण्याकरिता या पोथ्या आहेत असे मला वाटते. हे सर्व सोडून दिल्याखेरीज यांची बरी गत मला दिसत नाही. मग ईश्वराची इच्छा!' (पत्र क्र. ६१)
 ४. खरा धर्म :- रूढ धर्मावर याप्रमाणे प्रखर टीका केल्यावर काही पत्रांतून लोकहितवादींनी आपल्या मते खरा धर्म कोणता त्याचे विवेचन केले आहे. 'नीतिप्रशंसा' या पत्रात ते म्हणतात, 'आता जो धर्म चालला आहे हा धर्म नव्हे. हा बेबंद गोंधळ आहे. यात काही नाही. नीती नाहीशी झाली व धर्म बुडाला. मला तर धर्म कोठे दिसत नाही. म्हणून धर्माची स्थापना करण्याचा माझा प्रयत्न आहे.' (पत्र क्र. ६५). धर्मस्थापनेच्या ह्या प्रयत्नाचे स्वरूप त्यांनी 'धर्म सुधारणा' या पत्रात स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते हे कार्य एकट्या-दुकट्याने न करता ज्यांच्या मनात देशाचे कल्याण आहे त्यांनी एकत्र