पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ११

पुनरुज्जीवनापूर्वी युरोपात धर्मधुरीणांची व समाजाची हीच श्रद्धा होती. धर्मनियम दुर्लंघ्य आहेत, समाजाच्या उत्कर्षापकर्षावरून त्यांची पारख करणे हे पातक होय. कारण धर्मनियम म्हणजे परमेश्वराची निःश्वसिते होत, असे मत तेथे रूढ होते. जो समाज धर्मनियमांकडे या दृष्टीने पाहतो त्याचा अधःपात झाल्यावाचून राहत नाही. महाभारतकाळी भारतात असली अधोगामी विपरीत दृष्टी नव्हती. समाजाच्या उत्कर्षासाठीच धर्मनियम केले आहेत, ज्याने उत्कर्ष साधतो त्यालाच धर्म म्हणावे, लोकांचेसाठीच धर्म आहे; अशी अनेक व्यासवचने, श्रीकृष्णवचने महाभारतात आहेत. पण या वचनांचा भारताला विसर पडला. म्हणूनच सर्व प्रकारची संकटे त्यावर ओढवली. नवी दृष्टी प्राप्त होताच लोकहितवादींनी समाजाच्या नेमक्या याच व्याधीवर बोट ठेविले आणि 'बुद्धिरेव बलीयसी' असे मानणे हा त्यावर उपाय सांगितला. 'नियमन मनुजासाठी, मानव नसे नियमांसाठी जाणा' अशी पद्यपंक्ती रचून केशवसुतांनी धर्मविषयक हाच विचार भावनेच्या माध्यमातून लोकमानसात रूढ करण्याचा प्रयत्न केला होता.
 २. कर्मकांड हा रोग :- समाजाचा उत्कर्ष, त्याची धारणा, त्याची प्रगती, त्याचे वैभव हा खरा धर्माचा हेतू. याचा एकदा विसर पडला म्हणजे धर्माला केवळ कर्मकांडाचे रूप येते आणि भारतीय महाराष्ट्रीय समाजाला जडलेला सर्वांत भयंकर रोग हाच होय असे लोकहितवादींचे मत होते. ते म्हणतात, 'सांप्रत काळचे लोक इतके मूर्ख आहेत की, त्यांस 'चाल' म्हणजे काय असे कोणी पुसले तर ते म्हणतात, अरे, चाल म्हणजे धर्म. परंतु त्यांस कळत नाही की, धर्म, चाल व शास्त्र ही वेगवेगळी आहेत. परंतु हे लोक विद्वान असते तर मूर्खपणाने स्वतःचे घातास का प्रवर्तक होते?' (पत्र क्र. १६) 'हिंदू लोकांत सांप्रत आचार फार माजला आहे. म्हणजे किरकोळ निरर्थक कर्मे आणि ढोंगे फार होऊन, त्यातील बीजरूप जी नीती ती भ्रष्ट झाली आहे. ब्राह्मणांचे घरात जाऊन पाहिले तर आचार किती दिसतात. पिठास पाणी लागले म्हणजे ओवळे झाले, खरकटे, शिळे व उष्टे यांविषयी हजारो नेम आहेत.' असे सांगून मुकटा, धाबळ, भाजके, कच्चे, उष्टे, विटाळ, पन्नास वेळा हात धुणे, याचे तपशीलवार वर्णन लोकहितवादींनी केले आहे. आणि यालाच लोक धर्म समजतात याबद्दल खेद व्यक्त केला आहे. (पत्र क्र. ५८) ते म्हणतात, 'घरात लहान मुलामुलींना सदाचार शिकवावा, नीती शिकवावी, ते न करता पोरींना वाती लावाव्या, निरांजन लावून तूप जाळावे, तीळतांदूळ वहावे, नाना प्रकारची मूर्खपणाची व्रते करावी, याबाबतच्या कहाण्या तिला शिकवितात. नीती व सदाचरण याविषयी लोक