पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१० : शतपत्रे

म्हणजे त्यांच्या पायात बेड्या आहेत. त्यास इकडचे तिकडे हलवत नाही. जागच्या जागी श्रमी होतात आणि बेड्या तोडावयाजोग्या असूनही ते स्वस्थ दुःख भोगतात हे आश्चर्य आहे.' (पत्र क्र. २४). आज स्वातंत्र्यवीर सावरकर हा विचार पुन: पुन्हा मांडत आहेत. रोटीबंदी, बेटीबंदी, सिंधुबंदी इ. सप्तशृंखला हिंदू लोकांच्या पायात आहेत व त्या तोडल्यावाचून भारताला स्वातंत्र्य मिळावयाचे नाही व मिळाले तरी ते टिकविता येणार नाही, असे आपले मत त्यांनी 'जात्युच्छेदक' निबंधातून मांडले आहे. साठ-पासष्ठ वर्षांपूर्वी आगरकरांनी या शृंखलांवर घणाचे घाव घातले होते. पण त्यांच्याही आधी पन्नास वर्षे लोकहितवादींनी याच कार्याला प्रारंभ केला होता, यातच त्यांचे असामान्य मनोधैर्य दिसून येते, 'मनूचे वचन असो, याज्ञवल्क्याचे असो, कोणाचेही असो. ब्रह्मदेवाचे का असेना; 'बुद्धिरेव बलीयसी' असे आहे. तुम्ही उघड जे पाहता त्याचा बंदोबस्त, शास्त्रात नाही, म्हणून करीत नाही, हे योग्य नाही. शास्त्रास एकीकडे ठेवा, आपली बुद्धी चालवा, विचार करून पहा.' असा उपदेश त्यांनी पुनर्विवाहाचा पुरस्कार करताना केला आहे. (पत्र क्र. ७०). परदेशगमनाविषयी लिहितानाही त्यांनी हाच विचार सांगितला आहे. 'दुसरे मुलखात जाऊ नये असा शास्त्राचा अर्थ नसेल असे वाटते आणि जर कदाचित् असला तर ती शास्त्राज्ञा मानण्याची जरूर नाही' असे निर्भयपणे त्यांनी सांगितले आहे. (पत्र क्र. १९). 'चांगली व्यवस्था होईल तो नियम करावा; आणि जे पूर्वी शास्त्र लिहिले तेच सर्व काळ चालले पाहिजे असे म्हणणे मूर्खपणा आहे.' (पत्र क्र. १०६). 'शास्त्र म्हणजे लोकांस सुख होण्याकरता रीत घातली आहे, त्यातून जर विपरीत काही असेल तर ते एकीकडे ठेविल्यास चिंता काय ? शास्त्र असो की नसो परंतु हित जाणून शास्त्र एकीकडे ठेवून ही रूढी (पुनर्विवाहाची) घालावी.' (पत्र क्र. १०७). असे विचार त्यांनी ठायी ठायी प्रगट केले आहेत.

२. धर्मशास्त्र


 १. धर्म समाजासाठी आहे- ही सर्वस्वी नवी अशी दृष्टी आहे. इंग्रजी ग्रंथांच्या अध्ययनाने लोकहितवादींना ती प्राप्त झाली होती, हे महाराष्ट्राचे मोठे सुदैव समजले पाहिजे. धर्म हा समाजासाठी असतो, समाज धर्मासाठी नसतो हा विचार उदारमतवादी जगात आत सर्वमान्य झाला आहे. पण भारतात इंग्रजांपूर्वीच्या हजार वर्षांच्या काळात लोकांना त्याचा गंधही नव्हता. समाजाचे काहीही होवो, धर्माज्ञा पाळल्याच पाहिजेत. अशीच त्या वेळी शास्त्री- पंडितांची वृत्ती होती. आणि समाज अंधपणे त्यांच्या मागून चालला होता. ग्रीक विद्येच्या