पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ९

फिरत आहे. त्यास विचारले की, तापी नदीचा उगम कोठे आहे तर म्हणतो की, ती यमाची बहीण असे पुराणांत लिहिलेच आहे. याप्रमाणे पुराणे वाचून त्याचे मनात अनेक कल्पित कादंबऱ्या भरून त्याला हल्ली सृष्टी आहे त्याहून वेगळी दिसते. संक्रान्त हे सूर्याचे राशिक्रमण आहे हे तो जाणतच नाही. ती रेड्यावर बसून दक्षिणेस जाते, ती दीडशे कोस लांब आहे. तिचे मागे किंक्रान्त आहे असेच तो मानतो. त्यास वाटते की हे अलौकिक ज्ञान जे कोणास ठाऊक नाही ते मला पुराणामुळे ठाऊक झाले. या अभिमानात तो असतो. वास्तविक पाहिले तर त्याचे ज्ञान एक कपर्दिकेच्या किंमतीचे नसून त्याचे व इतर लोकांच्या नाशास कारण झाले.' (पत्र क्र. ८४).
 ५. नव्या भौतिक विद्या- हिंदू लोकांची सुधारणा व्हावयाची तर त्यांना मुख्य म्हणजे विद्या हव्या होत्या, पण त्या विद्या पुराणातल्या नव्हे तर सत्यप्रतिपादक! 'ज्या नव्या विद्या त्या काळी प्रकट झाल्या होत्या, ज्या वास्तविक व्यवहार व जग यांच्या दर्शक होत्या' त्या विद्या हव्या होत्या. लोकहितवादींच्या मते संस्कृत विद्या अगदी उपयोगी नव्हती, कारण त्यात असत्य फार भरले होते. मुलांना अठराही पुराणे शिकविली तरी त्यांना ज्ञान काय प्राप्त होणार ? तर दूध, तूप, मध यांचे समुद्र आहेत. स्त्रिया या कपटी, मूर्ख, निर्दय अशा असतात. ब्राह्मणांच्या पायाचे तीर्थ नित्य प्यावे, असल्या विद्या जितक्या वाढतील तितके अज्ञान दृढ होईल व हा देश मग कधीही सुधारणार नाही, असे त्यांचे निश्चित मत होते.
 ६. शब्दप्रामाण्य- त्या वेळी लोकांत, शास्त्रीपंडितांतही अत्यंत गाढ, घोर अज्ञान पसरले होते. त्यांचे मुख्य कारण म्हणजे पुराणश्रवण हेच होय, हे आपले मत लोकहितवादींनी अनेक ठिकाणी सांगितले आहे. या पुराणांमुळे भारताला आणखी एक रोग जडला व तो म्हणजे शब्दप्रामाण्याचा. वेदात, पुराणात व इतर कोणत्याही ग्रंथात जे लिहिले असेल ते आंधळेपणाने खरे मानावयाचे ही जी प्रामाण्यबुद्धी ती या समाजाच्या अधःपाताला कारण झाली होती. स्वतंत्र बुद्धीने विचार करण्याचे या समाजाला, त्यातील भटभिक्षुकांना, शास्त्रीपंडितांना वावडेच होते. ते फार मोठे पातक होय असे त्यांना वाटत असे. प्रत्येक ठिकाणी शास्त्र हे प्रमाण मानलेच पाहिजे, अशी त्यांची श्रद्धा होती. लोकहितवादींनी या शब्दप्रामाण्यावर, शास्त्रावरील या अंधनिष्ठेवर फार प्रखर टीका केली आहे. ही अंधश्रद्धा म्हणजे समाजाच्या पायातली बेडीच होय असे ते म्हणतात. 'अलीकडे किती एक मूर्खपणाचे समजुतीमुळे लोक कैदेत आहेत.