पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १६५

ज्ञानाचा अर्थ होतो. ज्यामध्ये ज्ञान नाही ती अक्षरे वाळल्या झाडाप्रमाणे आहेत. याजकरिता ज्ञान असले पाहिजे. परंतु ब्राह्मण लोक अज्ञानी फार आहेत. हे भटांचे काम झाले. नंतर पंतोजी याचे काम असे आहे की, त्याणे लिहावयास व वाचावयास शिकवावे. आणि वेताळपंचविशी आणि शुकबाहात्तरी ही वरवर वाचवावी. या दोन्ही बखरी मूर्खपणाच्या माहेर आहेत. त्यापासून नीती येणार नाही. अशी शिक्षा असल्यावर कोण मूर्ख होणार नाही ?
 यास्तव मला वाटते की, शास्त्री, पंडित व जे कोणी शहाणे असतील ते असोत. परंतु बहुतकरून पढतमूर्ख फार आहेत. जे लोक-हितेच्छू असतील त्यांणी शास्त्राधारे एक ग्रंथ करावा की, जेणेकरून सर्व आपले ब्राह्मणांस धर्माचे ज्ञान सुलभ रीतीने होईल. आणि हा ग्रंथ चालते भाषेत असावा, आणि मुंज झाली म्हणजे संध्या वगैरे कर्मानुष्ठान करावयाचे त्याचे अर्थही त्यात असावे. आणि जे जे ब्राह्मण लोक करीतात त्याचे तात्पर्य त्यात असावे. तसला ग्रंथ मुंज होताक्षणी मुलास पढवावा म्हणजे त्यांस आपला धर्म काय हे तरी कळेल. व एणेकरून धर्माचा उद्धार होईल. सार्थ ग्रंथ पढविल्यावाचून काही उपयोग नाही. मुंजीत बहुल्यावर मुलास बसवून उपदेश केला, तर त्यांस आणि डोल्यांत फकीर व्हायचे समयी मुसलमान कलमा पढतो तो उपदेश करून घेणारास फळ सारखेच आहे. याचा किंवा त्याचा त्यांस अर्थ ठाऊक नाही. बापाने मुंज केली आणि पुढे फकीराने फकीर केले, तात्पर्य एकच. एकास वाईट म्हणणे व दुसऱ्यास चांगले म्हणणे, हे ज्ञान झाल्यावाचून होत नाही.
 जेव्हा एकाचा अर्थ कळेल आणि हे चांगले असे वाटेल, तेव्हा दुसरे वाईट म्हणेल. नाही तर म्हणणार नाही. सांप्रत हिंदू लोकांस आपला धर्म अमूक व अमूक गोष्ट चांगली आहे, हे समजत नाही, जे ओघास येईल ते चांगले म्हणतात व जसा प्रसंग येईल तसे करीतात. धर्म नाही, कर्म नाही, चांगले काय व सत्य काय याची ओळख नाही व ज्ञानही नाही. याजपासून हे सर्व अनर्थ झाले आहेत.

♦ ♦