पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६६ : शतपत्रे निरुद्योगीपणाच्या चाली M पत्र नंबर ४३ : १४ जानेवारी १८४९ या काळी लोकांस काही उद्योग नव्हता, पीक फार येत होते व खावयास लोक कमी होते, त्या काळी वेळ जाण्याच्या किती एक युक्ती काढल्या आहेत. जसे आता इंग्रज लोक सक्त मजुरीची शिक्षा देतात, याचे कारण असे आहे की, जे आळशी लोक असतात, ते चोऱ्या करून उपजीवन करतात, त्यांस मेहनत करण्याची सवय लागावी, म्हणून अशी शिक्षा देतात. तद्वत हिंदुशास्त्रात किती एक कलमे आहेत, त्यांचा उपयोग पाहिला असता काही एक नाही व त्यात नीती किंवा विद्याही नाही. फक्त काळ मात्र जावा अशी कामे त्यात कित्येक आहेत. ती कोणती ते ऐका. पुराणात असे आहे की, एक एक तांदूळ निवडावा आणि लक्ष तांदूळ मोजून देवावर घालावे. माझे पाहण्यात कित्येक धर्मशील अशा स्त्रिया आल्या आहेत की, त्यांनी चातुर्मासात चार महिने आपले डोळ्यांत रक्त उतरून घेऊन पाच लाख तांदूळ आणि गहू मोजले व त्यांच्या पुड्या बांधून मोठ्या प्रयत्नाने त्या देवास वाहिल्या. किती एक स्त्रिया अशा आहेत की, पाच वर्षेपर्यंत वाती करतात, रुद्रवाती, दगडवाती, धोंडेवाती अशा प्रकारच्या कापसाच्या वाती सगळा दिवस त्यात घालून तयार करतात. आणि एका दिवशी त्याजवर दहा रुपयांचे तूप घालून देवळात जाऊन त्या जाळतात, यापलीकडे काही मूर्खपणा राहिला नाही. त्यांस पुसले तर म्हणतात की, उपाध्येबावांनी असे करावयास सांगितले आहे ब यामध्ये फार पुण्य आहे ! अहाहा ! काय हे पुण्य ! इतकी वर्षे जर उपयोगी विद्या वगैरे शिकण्यात खर्च केली तर केवढा लाभ होईल ? व केवढी योग्यता होईल ? परंतु पुराणिक देवळात बसून ऐकणारास फार वेड लावतात की, मी एक स्त्री पाहिली, तिचा नेम तर फारच विलक्षण होता. तिने गाई दाणे घालावे आणि तिचे शेणात जे दाणे पडतील ते शेण घेऊन गोमूत्रात धुवावे. आणि ते दाणे निवडून दळून त्याची भाकरी करून खावी. याप्रमाणे चार महिने तिने शेणातील दाण्यांवर उपजीविका केली. कधी पसाभर व कधी चार पैसे भार सापडत, तितकेच खाऊन ती राही. आणि भटजीबाबा तिचे व्रत मोठे व ती मोठी पुण्यवान बायको म्हणून स्तुती करीत. आणखी अशीच कित्येक व्रते आहेत. त्यांचा