पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६४ : शतपत्रे

कार्य होत नाही. हिंदू लोक ज्या ठिकाणी डौल असेल त्यांस चांगले व थोर म्हणतील व ती गोष्ट करतील. याचे कारण ज्यांचे ठायी अज्ञान फार, ते डौलाने फसले जातात. जर खरे खरे सांगितले तर त्यांची आवड बसत नाही. पहा की, मुसलमान लोक हिंदुस्थानात परदेशाहून येऊन येथे त्यांणी वास्तव्य केले व धर्म चालू केला व हिंदू लोकांना ती मौज वाटली म्हणून हिंदू लोकही नवस करतात, व त्यांस देव मानतात. जर या डोल्यांमध्ये तमाशा आणि डौल नसता तर कोणी हिंदू लोक त्यांस न स्वीकारते, यात संशय नाही.
 हिंदू लोकांची मने फार हलकी आहेत. त्यांस राजाही तसाच पाहिजे. राजाजवळ डौल असला म्हणजे त्याने अन्याय केले तरी चिंता नाही. पहा, बाजीरावाचे वर्णन भट व भडवे पुष्कळ करतात. कोणी म्हणतात की, दोन्ही काळ ते वेळेस संध्या करीत होते. ब्राह्मण भोजन घालीत होते. श्रीमंत असे होते, तसे होते. पण वास्तविक त्यांचे गुण कसे होते, ते काही कोणी बोलत नाही, कारण त्यांच्या संपत्तीने हे लोक भुलले होते आणि या लोकांमध्ये द्रव्य हीच अब्रू आहे. अब्रू आणि द्रव्ये ही निराळी नाहीत.

सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते ।

 या श्लोकेकरून कवीने लोकांचे मूर्ख समजुतीचे वर्णन केले आहे आणि याप्रमाणे प्रत्यक्षच आहे. इंग्रज लोकांनी हिंदू लोकांस नाव दिले आहे की, "सेमी बार्बरस" म्हणजे "अर्धे रानटी" तसे हे लोक आहेत खरे. हे पूर्ण रानटी म्हणावे तर नागवेउघडे फिरत नाहीत. एवढेच कमी आहे.
 परंतु या लोकांस ज्ञान अगदी नाही आणि भोळसर फार. जो लाथ मारावयास योग्य, त्याचे हे पाया पडतील आणि त्याने थोडासा डौल घातला तर त्यांस महाराज म्हणतील आणि भुलतील. असे हे लोक विलक्षण आहेत. वरवर भाषण करावयाची त्यांस फार खोड आहे. कोणतेही गोष्टीचा त्यांस अभिप्राय पुसला, तरी त्यांस उत्तर देता येत नाही व त्यांस काहीच कळत नाही. खाणेपिणे याचे मात्र त्यांस ज्ञान आहे. परंतु ते ज्ञान जनावरांसही स्वभावेकरून असते. मनुष्यास मुख्य सुशिक्षा व नीती यांची मूळ तत्त्वे माहीत पाहिजेत, परंतु ब्राह्मणांस हे काहीच नसते. पूर्वी ब्राह्मण अर्थज्ञ होते. धर्माचा विचार करीत होते, ग्रंथ लिहीत होते. पढवीत होते व धर्मात वाईट असेल ते सुधारीत होते. असे मागील ग्रंथांचे परंपरेवरून दिसते.
 हल्ली लहान मुलांस ब्राह्मण लोक मुंज झाली म्हणजे भटाचे स्वाधीन करतात. परंतु त्याचे ज्ञान गुरूस व शिष्यास काहीच नसते. विद्या या शब्देकरून