पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १६३

आहे ? अज्ञान फार झाल्यामुळे मुसलमानांपुढे बसून त्यांचा संस्कार आपले देहास करून घेऊन फकीर होतात. यात व ख्रिस्ती धर्माचा बाप्तिस्मा घेण्यात काही अंतर नाही, एक मुसलमान होतो, दुसरा इंग्रज होतो. दोघांचा संस्कार सारखा आहे. परंतु याजविषयी लोकांस अगदी शरम नाही. ते कर्ज काढून ताबूत करतात. व अडाणी लोक त्यांस नवस करतात. तसेच ब्राह्मण लोकही काही काही भ्रष्ट झाले आहेत असे माझ्या ऐकण्यात आहे. ब्राह्मणांच्या बायका ताबूत निघतात त्या दिवशी नवसाच्या घागरी ताबुताचे पुढे ओततात, देवावर अभिषेक करावयाचा सोडून अशी कर्मे करतात, तेव्हा ईश्वराचा क्षोभ या लोकांवर कसा होणार नाही ? व्हावा हेच योग्य. हे लोक अज्ञानाने जनावरांपेक्षादेखील मूर्ख झाले. हिंदू धर्म बुडोन गेला. आता धर्म म्हणून कोणी जाणत नाही. लग्ने, मुंजी या चाली पडल्या म्हणून करतात. त्या धर्म काहीच समजत नाहीत. मुसलमानांची चाल संपूर्ण हिंदू लोकांनी घेतली आहे. जर या देशात कोणी विद्वान असते तर आजपर्यंत यांचा प्रतिबंध करण्यास यत्न करिते.
 पण पेशवे व त्यांचे पदरचे मोठमोठे शास्त्री असून त्यांणीदेखील हा विचार केला नाही. हिंदू लोक मुसलमान होत, त्यांस मदत मात्र करीत गेले, परंतु त्याची बंदी करावी, हे त्यांस योग्य होते. जांस हिंदुस्थानात धर्मस्थापना करावयाची असेल त्यांणी शंकराचार्यांसारखे सर्व हिंदुस्थानात धर्म सांगत फिरले पाहिजे, तेव्हा हे ताबूत करण्याचे काम बंद होईल; नाही तर मोठा हा अधर्म आहे. यावरून हिंदू लोकांची चित्ते समजतात.
 चालीस विरुद्ध काही केले तर मात्र वाईट म्हणतात. अधर्म म्हणजे काय, याचे त्यांस ज्ञान नाही व धर्म याचा अर्थही कळत नाही. घरात चाल चालत आली असते त्याप्रमाणे आंघोळ करतात, भस्म लावतात, फुले आणून पूजा करतात. त्याचा अर्थ त्यांस कळत नाही. डोले करतात, ते मुसलमानांचे अन्न एके ठिकाणी बसून खातात. त्यांस कोणते प्रायश्चित्त असावे ? हिंदू धर्माशी विरुद्ध मुसलमान व ख्रिस्तीयन लोक सारखेच आहेत. आणि ख्रिस्तीयन कोणी झाला तर सर्व लोक त्याविषयी आश्चर्य करतात. परंतु हे हजारो लोक मुसलमान होतात, याविषयी ते स्तुतीच करीतात. त्यापेक्षा जी गोष्ट फार प्रघातात पडली ती नीट दिसते आणि जिचा प्रघात पडला नाही, ती वाईट दिसते, तात्पर्य खरे-खोटे, वाईट- बरे कोणी पहात नाही, चालीवर जातात.
 हिंदू लोकांमध्ये दुसरा एक दुर्गुण असा आहे की, त्यांस डौल आणि इतमाम फार आवडतो. जर इंग्रज लोक ताबुतासारखा काही धर्म काढून पुष्कळ पैसा खर्च करतील तर बहुत हिंदू लोक त्यांचे धर्मात जातील. परंतु शुष्काशुष्की