पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८ : शतपत्रे

संसारसुख आहे. याजकरिता किती एक जण इंग्रजी शिकतात. त्यांस लोक पुसतात की, तुम्हांस रोजगार लागला. आता विद्या शिकता कशाला ? शहाणपण व ज्ञान म्हणजे काय याचा अर्थच त्यांस कळत नाही.' (पत्र क्र. ६९).
 ३. पाठांतर हीच विद्या- स्वतः असे अडाणी असूनही ब्राह्मणांना गर्व कशाचा वाटत असे ? तर त्यांच्या संस्कृत विद्येचा. पण संस्कृत विद्येत ते पारंगत होते असेही नाही, तर त्यांस जुने संस्कृत ग्रंथ पाठ येत असत आणि या पाठांतरासच ते 'विद्या', 'ज्ञान' असे मानत असत. 'विद्या' याचा अर्थ असा व्हावा याची लोकहितवादींना अगदी चीड येत असे. ते म्हणतात, 'अहो, पाठ म्हणणे ही विद्या केली कोणी ? यात फळ काय ? हा मूर्खपणा उत्पन्न कसा झाला असेल तो असो. परंतु एवढा मूर्खपणा कधी कोणत्याही देशात झाला नसेल.' (पत्र क्र. ७७). लोकहितवादींच्या मते व्याकरण ग्रंथ केवळ पाठ म्हणून दाखविणे ही विद्याच नव्हे. मनुष्यास लाकडे तोडण्याचे कसब शिकविले तरी बरे. परंतु ही पाठांतरी विद्या नको, असे ते स्पष्ट म्हणतात, 'जांस अर्थ परिज्ञान नाही, नुसती अक्षरे वाचून पाठ म्हणतात त्यांचे ते शब्द जसे जनावरांचे ध्वनी तद्वत् आहेत. बैलाच्या पाठीवर साखरेच्या गोण्या घातल्या तर त्याला जसा त्याचा उपयोग नाही, तद्वत् ब्राह्मणांनी पुष्कळ पाठ केले, पण अर्थ ठाऊक नाही व ज्ञान नाही; तर काही उपयोग नाही.' (पत्र क्र. २०). याप्रमाणे केवळ अज्ञान नव्हे तर विपरीत ज्ञान हे भारताच्या अधःपाताचे पहिले कारण होय असे लोकहितवादी यांस दिसून आले.
 ४. पुराणांचे वर्चस्व- भट, ब्राह्मण व शास्त्रीपंडित यांची अशी विपरीत बुद्धी होण्याचे मुख्य कारण म्हणजे पुराणग्रंथ हे होय, असे लोकहितवादींचे मत होते. भारतामध्ये आज हजारो वर्षे लोक पुराणश्रवण करीत आहेत. या कारणाने जगाचे सत्य ज्ञान करून घेण्याचे त्यांच्या ठायीचे सामर्थ्यच नष्ठ झाले आहे. 'पुराणातील सर्व गोष्टी प्रारब्धावर व देवाचे सामर्थ्यावर रचल्या आहेत. गजेंद्रास शाप होता म्हणून नक्र झाला. अहिल्येस वर होता म्हणून उद्धरली. रावणास वानरांनी मारला, दुर्योधनास मारून भूभार कमी करावा म्हणून (श्रीकृष्णाने) युद्ध केले, हिरण्यकश्यपूस मारावयास खांबातून देव निघाला. वामनाने पायातळी बळीस पाताळी घातला. या गोष्टी व अस्त्रयुद्ध, रथवाहन, धर्मयुद्ध, प्रतिज्ञा, शाप, वरदान, तत्काळ ईश्वराची प्राप्ती या गोष्टी आता लागू करणे यांसारखा मूर्खपणा कोठे आहे ?' (पत्र क्र. ५५). 'कोणास म्हटले की, लंकेत कोलंबो शहर आहे तर तो म्हणतो की, लंका कोणास सापडावयाची नाही, तिच्या भोवती सुदर्शन