पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६२: शतपत्रे

आणून देऊन उजेडात बसविले तर बरे किंवा ते सोडून त्यांस अंधारातच ठेवून देवळातील मूर्तीजवळ पैशाचा कापूर नेऊन जाळावा हे बरे ? कोणत्याने ईश्वर तृप्त होईल ? ईश्वराने जे पदार्थ सजीव निर्माण केले आहेत, त्याचे रक्षण करावे, ते सोडून देवळातील दिवे लावावे तर काय फळ ?
 मला वाटते की, या गोष्टीचा ईश्वरासही क्षोभ येईल, कारण विचारेकरून असे कळते की, ईश्वराची इच्छा मनुष्याने मनुष्यास सांभाळावे. केवळ देवाची पूजा करावी त्याचा उपयोग काय ? जी गावची रयत आहे, तिने पाटलाकडे जाऊन त्याचे आज्ञेत वा वागावे किंवा गवरनरसाहेबापुढे जाऊन रहावे ? गवरनर त्याविषयी काय करू शकेल ? तद्वत मनुष्याने चांगला मार्ग सोडून गरिबास उपयोगी पडावयाचे सोडून कापूर देवळात जाळला तर उपयोग काय ? या मूर्खपणाने किती एक पैका व्यर्थ खर्च करतात व त्यांस धर्म म्हणतात. आणि त्यापासून लोकांचा काही उपयोग घडत नाही.
 असे किती एक लोक व्यर्थ द्रव्य टाकतात; त्यांस जर सांगावयास गेले, तर त्यांचे डोकीत लहानपणापासून वेड भरलेले असते, म्हणून ते ऐकणार नाहीत, आणि विचारही करणार नाहीत. असे दृढ मूर्ख ते आहेत. यास्तव त्याचे अंतःकरणात बोध व्हावा, म्हणून हे पत्र मी लिहिले आहे. वास्तविक धर्म कोणता आहे, ते त्यांणी समजावे, हे उत्तम आहे.

♦ ♦


डोले करण्याची चाल

पत्र नंबर ४२ : ७ जानेवारी १८४९

 सांप्रत हिंदू लोक धर्माभिमानरहित भ्रष्ट झाले आहेत. हे त्यांचे कृतीवरून समजते पहा, जातीचे हिंदू लोक असून मुसलमानाचा धर्म आचरितात. हल्ली पुण्यात मुसलमानांचे डोले दहा पाच होतात आणि हिंदू लोकांचे शंभर होतात. व हे लोक जसे बापाचे श्राद्धाची व काशीयात्रेची काळजी व तयारी करितात, तसा उद्योग करून डोले करतात, हे हिंदू धर्मास मोठे लांच्छन नाही काय ?
 जे हिंदू धर्मास जाणत असतील व खरे पंडित असतील त्यांस हा दुराचार पाहून लाज वाटावी, परंतु तेही डोळेझाक करतात, हा केवढा आंधळेपणा