पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १६१

 परंतु लोक सामान्यतः मूर्ख आहेत. त्यांस वास्तविक ईश्वर कळत नाही. याजकरिता ते त्यांस बळेच स्वरूप देऊन सगुण करून ठेवितात. त्याचे वर्णन असे करितात की, त्याचे हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहे. म्हणजे त्याचा अर्थ इतकाच की, तो लोकांस शासन करणारा आहे. चक्रे करून त्याचा अनादिपणा व अनंतपणा प्रगट होतो. ईश्वराची स्वरूपे अनेक प्रकारची वर्णन करतात. मूर्ख लोकांस ईश्वर कळण्याकरिता ही वर्णने केली, परंतु सार इतकेच की ईश्वर एकच आहे. त्यांस ब्राह्मणही नाकबूल नाहीत. परंतु त्या एक ईश्वराचे मनुष्याने मनन करावे. त्याचा विचार केला असता परमात्मा जो भगवान त्यांस मनुष्यांनी मूर्खपणाने भजावे. हेही अयोग्य हे व देवास लहान मानून मूर्ती करतात. याची निंदा गीतेत दोन ठिकाणी केली आहे, ते श्लोक -

अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥

(अध्याय ७, श्लोक २४)

 या प्रकारे करून ईश्वरास मूर्त मानणे हे मूर्खत्व आहे. ईश्वर अमूर्त हे त्याचे कृत्यावरून समजते; कारण की, त्याणे केलेली सृष्टी ती देखील मापता येत नाही. तेव्हा तिचे कर्त्यास परिमित जाणणे हा केवढा अपमान आहे ? यास्तव ईश्वराचे वर्णन आणि भजन करावे. इतकेच त्यांस पुरे. हृदयी त्याचे चिंतन करावे. हेच त्याचे थोरपणास योग्य आहे. आणि इतर उपचार नैवेद्यादिक त्यांस करू नयेत, मनुष्यास करावेत. काही देणे असल्यास देवास देऊ नये, कारण देव उणा व उघडा नाही. यास्तव मनुष्यास दिले तर देवास दिल्याहून अधिक आहे. ईश्वराचे दर्शन होत नाही. तेव्हा त्याचे ध्यान मनेकरून करावे. जे काही कृत्य आणि उपचार करावयाचे ते पात्रापात्र पाहून मनुष्याचे ठायी करावे हे उत्तम. आणि दयाधर्मास पात्र मनुष्य आहे, ईश्वर नाही. ईश्वर वर्णनास मात्र योग्य. जे काही अर्पण करावयाचे आहे, ते मनुष्यास करावे, देवास नको. तो सर्वत्र पूर्ण आहे.
 दगडास भजन आणि नैवेद्य कशास पाहिजे ? त्यापेक्षा ब्राह्मणास बरा, कारण तो प्रत्यक्ष खाणारा आहे. ईश्वराचे व्यक्त स्वरूप ही सृष्टी आहे. तेव्हा या व्यक्त स्वरूपाचे ठायी काय ते अर्पण करावे. दगड हा काही ईश्वराचे प्रत्यक्ष स्वरूप नाही. दगडापेक्षा जिवंत पदार्थ बरा, त्यांस क्षुधा आहे व तृष्णा आहे. त्यांस सोडून दगडापुढे अन्न ठेवावे, यात काय फळ ? एखादा गरीब अंधकारात बसला आहे. दरिद्राने पीडित आहे, ज्यास पैसा मिळत नाही, पैशाचे तेल