पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५८ : शतपत्रे

 या वचनेकरून असे ठरते की, नीती आणि सदाचरण हे लोकांचे कल्याण करण्यामध्ये आहे. याशिवाय पुण्य नाही. केवळ जे कर्माचे भजन करतात, ते ढोंगी आहेत. नीतिपर वर्तणूक असावी, हे प्रथम कर्म होय. नंतर कर्माची खटपट केली सारखी, न केली सारखी. याशिवाय कबीर म्हणतात, 'मन चंगा तो खाथोटमें गंगा.'
 याप्रमाणेच कलियुगी साधु झाले त्यांचे मत आहे. तस्मात् ढोंग करणारास पुण्यवान् जाणतात हे खोटे आहे. एका फारशी ग्रंथात पाहण्यात आले आहे की, एका अन्यायी राजाने एका पुण्यपुरुषास विचारले की, 'मी ईश्वराचे भजन कोणत्या रीतीने करावे ?' तेव्हा त्या साधूस त्याची वर्तणूक ठाऊक होती म्हणून त्याने उत्तर केले की, 'ईश्वराचे भजन तुला उत्तम हेच आहे की, तू सर्व दिवसभर आणि रात्री निजत जा.' तेव्हा राजाने पुसले, 'असे का' तेव्हा त्याने उत्तर दिले की, 'याचे कारण ईश्वराचे मुख्य भजन करणे म्हणजे त्याने जे जीव उत्पन्न केले, त्यातील ज्ञानी जीव जो मनुष्य त्याचे कल्याण करावे. आणि ही गोष्ट तुला निद्रा लागल्याखेरीज होणार नाही. कारण तुझ्या जागृतीने किती एक मेले जातील व अन्याय होतील. याजकरिता दुष्टास झोप हीच ईश्वरभक्ती आहे.' तेव्हा तो राजा त्या साधूस शरण गेला व त्याने जुलूम सोडून दिला.
 या दृष्टान्तावरून असे ठरते की, कर्माची खटपट करण्यामध्ये ईश्वरभजन नाही. ईश्वराचे भयाने वर्तणूक केली म्हणजे तीच भक्ती आणि तेच पूजन. तत्रापि जो अशी खटपट व ढोंग करितो त्यांस लोक पुण्यवान म्हणतात, हे आश्चर्य आहे. अमका गृहस्थ त्याचे कर्म इतर कसेही असो, परंतु प्रातःकाळी उठल्यापासून प्रहरभर स्नानसंध्या करण्याचा त्याचा नेम मोठा सदृढ आहे. असो. त्याने पूर्वजन्मी असेच केले. त्याचे फळ या जन्मी त्यांस आले आहे. या जन्मी स्नानसंध्या करतो. त्याचे फळ त्यांस पुढले जन्मी येईल, असे म्हणतात आणि त्याचे वाईट कामावर पडदा घालितात. हा मूर्खपणा आहे. ज्याचे कर्म वाईट असते आणि ज्याने जन्मभर दगडावर पाणी ओतले आणि झाडाची फुले तोडून रास केली. तरी देव त्याजवर कृपा करील काय ? नाही, सद्धर्माची मुख्य खूण हीच की, मनुष्याचे कल्याणाकडे लक्ष असावे. परंतु मनुष्याचे कल्याण करणे म्हणजे लुच्चे, सोदे यांचे रक्षण करणे किंवा फुकट जेवणारे लोक यांची पंगत माजविणे नव्हे. पात्रापात्र पाहून अज्ञान जे आहेत त्यांस शहाणे करण्याची योजना करणे. जे रोगी आहेत, त्यांस औषधपाणी करणे, जे दरिद्री व पीडित आहेत, त्यांस सुख देणे, आईबापांचा प्रतिपाळ व मान करणे हीच नीती व हेच पुण्य. जो देवावर एकही फूल घालीत नाही, परंतु वर्तणुकीने पवित्र व