पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १५९

नीतिमान आहे आणि परक्याचे दुःख जाणतो तो चांगला, जो लाख तुळशी रोज वहातो व आईबाप वा भावाचा शत्रू, इंद्रियभ्रष्ट व लोकांचे उपयोगी किमपि पडावयाचा नाही, तो चांगला नव्हे. नामदेव म्हणतो,

जग चालले उफराटे, कोण जाणे खरें खोटें ।
जित्या तुळशी बेला तोडा, पूजां निर्जीव दगडा ।
मुष्टी धरुनि मेंढा मारा, ब्राह्मण म्हणती यज्ञ करा ।
नामा म्हणे सर्व खोटे, भजन चाललें उफराटें ।

 याप्रमाणे साधूची भाषणे आहेत. याजवरून उनाड ब्राह्मणास राग येईल, कारण की येणेकरून त्याची फी बुडते, जर कोणी अभिषेक करील किंवा तुळशी वाहील, तर त्यांस पैसा मिळेल. किती एक लोक आपले भजनाची मजुरी ब्राह्मणास सांगतात. ती अशी की, ब्राह्मणांनी उपास करावा व त्यांस दक्षणा द्यावी. हे नफे ब्राह्मणांचे बुडतील. याजकरिता सदरील मत खरे आहे तरी ब्राह्मणांचा व भट मंडळींचा असा अभिप्राय पडतो की, डामडौल केले पाहिजेत. कारण त्याशिवाय त्यांचा निर्वाह नाही; परंतु खरी गोष्ट आहे ती त्यांणी कबूल करावी आणि लोकांचे अज्ञान दूर व्हावे, हेच चांगले. बहुधा जे ढोंगी स्नान-संध्या करणार असतात, ते तर फारच लबाड असतात, असे बहुधा पाहण्यात आहे. त्यांस असे वाटते की, आम्ही ईश्वराची भक्ती फार केली. आता काही केले, तरी चिंता नाही; परंतु हे बातळ आहे. अशा करण्याने ईश्वरप्राप्ति नाही; सत्कर्माने मात्र ईश्वर मिळतो.
 किती एक लोक असे आहेत की, हातात माळ घेऊन रोज लाख वेळ राम राम म्हणतात. असे करण्यास त्यांस त्यांच्या गुरूंनी सांगितलेले असते; परंतु अशी बडबड घशास कोरड पडेपर्यंत जरी केली, तरी त्यापासून फळ काहीही होणार नाही. जर लबाडी सोडली, तर मात्र फळ होईल. मग देवाचे नाव घ्या किंवा नको. जर आपण ईश्वराचे प्राणी आहोत, तर त्याचे भजन आपण असे केले पाहिजे की, जेणेकरून त्याची प्रीती आपणणांवर होईल. ज्या गृहस्थाचे आपणास साधन करावयाचे असते, त्याचे नाव जर घेत बसलो, तर काही उपयोग आहे काय ? तर त्यांस कृपा येईल, असे केले पाहिजे. त्यांस प्रिय आचरणाने त्याची प्रीती संपादन करावी. जर त्याचे घरी तगाद्यास बसले आणि म्हटले की अमके दे तर जाईन, तर तो मूर्खपणाचा निर्धार होईल. उत्तम पक्ष हाच की, मनुष्याने मनुष्याचे कल्याण करावे. देवाचे भय धरून नीतीने चालावे, म्हणजे ईश्वर प्रसन्न होतो. त्याचे जे प्राणी त्यांस उपद्रव केला