पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५६ : शतपत्रे

कशापासून ? तर विद्येची प्रसृती व विचार इंग्रजांमध्ये फार आहेत. हिंदू लोकांमध्ये एकही नाही. मोठा धर्म आणि दान करावयाचे झाले म्हणजे दोन हजार भटांस जेवण घालतात. कोणी पाच हजार खर्च लावून देऊळ बांधतात. कोणी मनास येईल तसा पैसा टाकतात. त्यांस योजना नीट कळत नाही. आमचे लक्षात एक गृहस्थ येतो. त्याने दोन लक्ष रुपये धर्मादायास काढले. त्यापैकी देवळास पन्नास हजार गेले. पंचवीस हजार ब्राह्मणभोजन, दहा हजार खर्च देऊन लग्ने केली, असा व्यय केला. हे पाहून मला वाटते की मूर्खपणाची हिंदू लोकांपुढे हद्द झाली. हे दोन लाख रुपये जर नीट खर्च केले असते, तर किती उपयोगाची कामे झाली असती बरे ? किती दरिद्राचा ऱ्हास होता. किती ज्ञान व शहाणपण पढवावयास येते ?
 परंतु मातीत पैसा कितीही घातला तरी त्याचा काही फायदा आहे काय ? माणसे ही जिवंत माती. त्यांस काही सुखाचा उपयोग व्हावा, हे टाकून मातीचा शोभेत द्रव्य खर्च करून काय उपयोग ? जर हिंदू लोकांस वास्तविक धर्म करावयाचा असेल तर इतकाच करावा की, जेणेकरून लोकांचे अज्ञान दूर होईल. पुस्तके व विद्या वाढतील व जेव्हा हे लोक मूर्खपणाच्या मार्गातून सुटतील, तेव्हाच सुखवृद्धी होईल.
 किती एक लोकांस हा चमत्कार वाटला आहे की, आम्ही शहाणेसुरते लोक आहो आणि आम्हास 'लोकहितवादी' वेडे व मूर्ख म्हणतात, याचे कारण काय ? आम्ही त्यांस सांगतो की, जेव्हा आम्ही तुम्हांस ज्ञानी इंग्रजाशी मिळवून पाहतो तेव्हा खरेच वेडे व शहाणे लोकांमध्ये जितका फरक दिसतो तितका फरक तुम्हामध्ये दिसतो. रोगापासून तुम्ही वेडे नाहीत, परंतु ज्ञानाचे तुळणेत वेडेच आहात. आयुष्याचा उपयोग कसा करावा ? आपला जन्म लोकांस कोणत्या प्रकाराने उपयोगी करावा ? आपण पृथ्वीवर होतो याची मागे स्मृती रहावी, याविषयी उपाय करावा. सारासार विचार करून ईश्वराचे भय बाळगावे व खरेपणा धरावा, हे कोणी पाहत नाही.
 धर्मात्मे लोक पुष्कळ आहेत व आम्ही धर्म फार केला, असे म्हणतात. परंतु आंधळ्यास त्यांनी जेवावयास घातले काय ? दीनगरिबांस वस्त्रे दिली काय ? अज्ञान्यांस ज्ञानी केले काय ? दुर्जनास सुजन केले काय ? कोणता परोपकार आपले लोकांमध्ये त्यांनी केला ?
 हल्ली इंग्रज लोक सर्व जिन्नस विलायतेतून आणतात व इकडील व्यापारी कोष्टी वगैरे उपाशी मरतात. तर त्या विद्या इकडे आणून लक्षावधी जिवांचे हित करण्याचा उद्योग कोणी केला आहे काय ? नाही.