पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १५५

मला समजत नाही." असे बोलताच फकीर विरस झाले आणि नानकाचा धर्म कबूल करते झाले.

♦ ♦


मानास व दानास पात्र

पत्र नंबर ३५ : १९ नोव्हेंबर १८४८

 एक मनुष्य दुसरे मनुष्याचा मान करतो, यास दोन कारणे आहेत. एक त्याचे आर्जव म्हणजे लाभदृष्टी व दुसरा कृतोपकार. आता इंग्रज लोकांस हिंदू लोक मानितात. आणि ज्यांचे त्यांजवळ काम नाही, तेदेखील त्यांस नरमतात. याचे कारण पाहू गेले तर मला वाटते की, अज्ञानी जर दोन इंग्रज लहान मोठे पदवीचेही एका जागी मिळाले तरी ते इतके लवणभंजन करीत नाहीत. पण हिंदू म्हटला म्हणजे फारच करितो. एकादा साहेब आला म्हणजे रस्त्यातील माणसे पैस होतात. मामलेदार व मुनसफ यांचे घशास कोरड पडते व किती एक घेरी येऊन डोळे पांढरे करतात, अशाही गोष्टी ऐकण्यात आहेत. याचे कारण काय ? जर हिंदू लोक विलायतेस जाऊन त्यांची सर्व प्रकरणे ध्यानात आणतील, तर मग मला वाटते की, इतके अज्ञान, मोह आणि अतिशय मान राहणार नाही.
 मागे एलफिस्तन साहेब वगैरे यांनी आपले ग्रंथात असे लिहिले आहे की, जोपर्यंत हिंदू लोक आमचा मान देवाप्रमाणे अज्ञानाने करतात, तोपर्यंत आम्ही त्यांचे मुलखात राहू. पुढे राहणे कठीण आहे. जसे एखादे मोठे जनावर एखाद्याचे दृष्टीस पडले म्हणजे चपापतात. तसेच इंग्रज लोकांपुढे हिंदू लोकांचे होते. त्यांचे स्थान, कर्म, रीत, व्यवहार काही एक हे लोक जाणत नाहीत. याजमुळे इंग्रजांचा फार नफा आहे. या अवस्थेत हिंदू लोक जितके दिवस राहतील तितके दिवस त्यांची येथे वस्ती होईल, हा नेम आहे. जोपर्यंत जुने लोक आहेत, तोपर्यंत ही व्यवस्था अशीच चालेल, पुढची उत्पत्ति ज्ञानात श्रेष्ठ होईल, यात संशय नाही.
 पहा, इंग्रजांनी आपले शहाणपणाने या लोकांस किती घेरले आहे ! व्यवहार व राज्य सर्व त्यांचे हाती गेले आहे. याचे कारण अक्कल आहे. अक्कल