पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५४ : शतपत्रे

 जेव्हा ईश्वर आहे, हे कळले व तो पराक्रमी आहे इतके ज्ञान अल्पमती मनुष्यास झाले, त्याजवरून त्याचे पूजन आणि भजन इत्यादी निघाले. धर्ममार्ग निघाला. त्याचे भय उत्पन्न झाले. परंतु ईश्वर आहे. आणि तो महान पराक्रमी आहे. त्याचे शक्तीस दुसरे काही तुल्य नाही, असे मात्र कळते, यापलीकडे काही कळत नाही. जे कोणी भयाकरिता व लोकांस नीतीने वागण्याकरिता सांगतात की एकवीस नरक आहेत. ते सर्व भयाकरिता आहेत. तथापि खोटे म्हणवत नाही. जे जे ईश्वरास म्हणावे ते त्यांस योग्य दिसते. कोणी म्हणेल की, ईश्वर असे करितो, तर ते खरे म्हटले पाहिजे. कारण की, तो अत्यंत पराक्रमी व अनादी आहे. तेव्हा त्याचे माहात्म्य तसेच आहे. परंतु जे विचारास येत नाही. ते मात्र मत मान्य करू नये. नाही तर ईश्वरास सर्व शोभते. मग कोणाची जिव्हा व कोणाची बुद्धी ही कशीही वदो, परंतु चांगले मात्र असावे.
 आणि ईश्वराचे अगम्य बुद्धीपासून सर्व धर्म उत्पन्न झाले; याहून जास्ती ईश्वराचे काही एक कळत नाही. वेदांत व शास्त्रांत दोन शब्दांनी ईश्वराचे वर्णन केले आहे. 'तत् सत्' या शब्देकरून सृष्टीहून वेगळा असे दर्शविले. म्हणून दूरदर्शित सर्वनाम घातले आणि दुसरा शब्द 'सत्' आहे. म्हणजे आस्तिक्य वाक्य भाव. हे वर्णन बरोबर, खरे आणि विचारयुक्त आहे. यावरून हजारो पुराणिक, कोणी म्हणतो नारायण क्षीरसागरात होता, कोणी म्हणतो वैकुंठात होता, अशी नाना प्रकारची वर्णने आहेत ती खरी आहेत आणि खोटी आहेत कारण ईश्वर सर्वत्रच आहे. परंतु या सर्वांहून त्या दोन शब्दांनी जसे ईश्वराचे सत्य स्वरूप वर्णन झाले, तसे कोठेही नाही. बाकीची वर्णने ज्याची मने अडाणी आहेत त्यांस उपयोगी. परंतु वास्तविक ते आहे, म्हणजे सृष्टीहून महत्कारण वेगळे आहे, इतके जाणतो. कसे आहे? काय आहे ? त्याचे वर्णन पुराणात सांगितले आहे की, ब्रह्मदेव प्रथम पुरुष निर्माण झाला आणि विचार करू लागला तो गड़प झाले. तेव्हा ते आहे. ही श्रुती म्हटली येणेकरून तात्पर्यार्थ सांगितला.
 मला वाटते की, ब्रह्मदेव म्हणजे विचार, हा ईश्वराचा शोध करता करता घोटाळ्यात पडला आणि ईश्वर तर सर्वत्र आहे. एक गोष्ट आहे की, नानक, शीख लोकांचा गुरू, हा एके दिवशी पश्चिमेस पाय करून निजला होता, तो फकीर लोक तेथे आले. त्यांनी पुसले की, "अरे, पश्चिमेस ईश्वराचे स्थान मक्का आहे. तिकडे तू पाय का ठेवितोस ?" त्याने उत्तर दिले की, "मी हिंदू नाही व मुसलमानही नाही. मी विचाराने, धर्माने चालतो. तुम्हास जिकडे देव नाही असे दिसत असेल तिकडे माझे पाय उचलून ठेवा. तुमचा शास्त्रार्थ