पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ७

आहे व लोक कसे आहेत, याविषयी त्यांस काही कळत नाही. पुराणिक एक पोथी सोडून बसला म्हणजे सर्व आनंदाने डोलतात. व रावणास दहा डोकी, सहस्रार्जुनास हजार हात, दुधाचा समुद्र, दह्याचा समुद्र इ. गोष्टी ऐकल्या की बायका फार खूष होतात व पुरुष म्हणतात आम्ही आज फार मोठे ज्ञान संपादन केले. हे पहिले जुने लोक आहेत ते शुद्ध बैल आहेत. त्यांस खाण्यापिण्याचे मात्र ज्ञान आहे व ते जनावरासारखे कर्म करतात.' (पत्र क्र. ३०) 'हे शास्त्री, भट व संपूर्ण हिंदू लोक अजून मागल्या गोष्टींचे भरात आहेत. त्यांस अजून सांप्रतचे काही सुचत नाही. त्यामुळे कित्येक लाक पोरासारखे बोलतात की, विलायत बेट लहान दोनचार कोसांचे आहे. कोणी म्हणतो टोपकर हे पाण्यातले राहणारे, कोणी म्हणतो कंपनी सरकार बायको आहे. इंग्रजांस राज्य करू लागण्यास दोनशे वर्षे झाली आणि या लोकांच्या डोकीवरचे केसदेखील त्यांनी मोजले. पण या लोकांस त्यांचे डोळेही ठाऊक नाहीत.' (पत्र क्र. ३४)
 २. अज्ञानातच भूषण- या अज्ञानाचा तर लोकहितवादींना उद्वेग येत असेच; पण आपण अज्ञानी लोक आहो हे जाणून नव्या ज्ञानाच्या अभ्यासा उद्युक्त व्हावे यासाठी ब्राह्मणांची व शास्त्रीपंडितांची तयारी नव्हती, याचे त्यांना पराकाष्ठेचे दुःख होत असे. 'पुण्यात लायब्ररीची स्थापना' या पत्रात ते म्हणतात की, 'आपले लोक ज्ञान संपादन करणे हे लहान मुलांचे काम असे समजतात आणि शिकत नाहीत. ते केवळ अडणीवरचे किंवा सांबापुढचे असून विद्येस तुच्छ मानतात व थोडे खावयास मिळू लागले म्हणजे आपली अप्रतिष्ठा होईल असे समजून वाचणे व अभ्यास करणे सोडून देतात. याबद्दल वाईट वाटून त्यांचा फार राग येतो. ज्याच्याजवळ द्रव्य आहे ते मदान्ध त्यांस वाटते विद्या काय आहे ? विद्येचे सार जे द्रव्य ते आम्हाजवळ आहे, असे त्यांस वाटते व ते आपल्याला चंद्रसूर्याइतके उंच समजतात.' (पत्र क्र. ३). ' सांप्रत कोणत्याही ब्राह्मणास पुसा की, इंग्रज शहाणे आहेत काय ? तर ते म्हणतील की, छी छी, शहाणे कशाने ? त्यांस काय येत आहे ? त्यांची विद्या, शास्त्रे व ज्ञाने सर्व आमच्याहून कमी आहेत. ब्राह्मणांना आपलेहून वरिष्ठ कोणीच वाटत नाही. कोणाचाही ग्रंथ त्यांचे हातात द्याल तर ते म्हणतील की, 'दगड आहे यात ?' नावदेखील वाचून पाहावयाचे नाहीत. तसेच शास्त्री- पंडित यांस सर्व तुच्छ वाटते. आपले ठिकाणी गर्व करून ते बसतात. अलीकडे नवे ग्रंथ बहुत झाले आहेत, रसायनशास्त्र, यंत्रज्ञान, शिल्प इत्यादिक. परंतु त्यांतील गोष्ट कोणी एकही पहात नाही.' (पत्र क्र. ९५). 'लोकांमध्ये समजूत अशी आहे की ज्ञान मिळणे हे