पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६ : शतपत्रे

'शतपत्रां'चा विषय आहे.

१. भौतिक विद्या


 १. अज्ञान- थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राच्या देहाची तपासणी करताना तो देह अनेक व्याधींनी ग्रस्त झाला आहे, असे लोकहितवादींच्या ध्यानात आले. त्यातील पहिली व्याधी, महाव्याधी म्हणजे 'अज्ञान' ही होय. प्राचीनकाळी विद्येचे माहेर, सरस्वतीचे मंदिर अशी या भूमीची कीर्ती होती, पण आज अज्ञानाच्या महारोगाने ती जर्जर झाली होती. हे अज्ञान अत्यंत केविलवाणे होते, घृणास्पद होते; करुणास्पद होते. त्याचे स्वरूप पाहता आजही शिसारी येते. मग प्रत्यक्ष त्यातच वावरणाऱ्या लोकहितवादींना काय होत असेल याची सहज कल्पना येईल. येथल्या ब्राह्मणांना, शास्त्रीपंडितांना ही शुद्ध जनावरे आहेत, बैल आहेत, हे टोणपे आहेत असे पत्रोपत्री त्यांनी म्हटले आहे. पण त्या वेळच्या या पंडितांच्या अज्ञानाची आपल्याला जर कल्पना आली तर लोकहितवादींच्या या तीव्र संतापाचे आपल्याला नवल वाटणार नाही.
 इंग्रज येथे आल्याला शे-दीडशे वर्षं त्या वेळी होऊन गेली होती, पण हे लोक कोण, ते कोठून आले, त्यांची राज्यव्यवस्था काय, त्यांची शस्त्रास्त्रे काय, त्यांची विद्या काय याचे लवमात्र ज्ञान हिंदु लोकांना- ब्राह्मणांना किंवा सरदारांना नव्हते. लोकहितवादी म्हणतात, 'कोणास खोटे वाटेल तर त्याने स्वदेशीय राजधानीतील लोकांकडे पहावे आणि त्यास पुसावे की, "इंग्रज हिंदुस्थानात कोठे कोठे राज्य करतात ?" ते म्हणतील की, "छी! इंग्रज कोठे आहेत ? आमचे संस्थानात तो एक ताम्रमुखी मात्र असतो." याचप्रमाणे पेशवाईत अवस्था होती. (पत्र क्रमांक ४८)' 'ब्राह्मणांना अजूनही वाटते की पृथ्वी शेषावर आहे, ग्रहणात राहू चंद्रास ग्रासतो. हिंदुस्थानाएवढीच पृथ्वी. पलीकडे गतीच नाही. ब्राह्मण सर्व जगात श्रेष्ठ, वेदांचा अर्थ करू नये.' (पत्र क्रमांक ६२). 'कोणी म्हणतो पेशव्यांचे राज्य कसे बुडाले हो?' दुसरा उत्तर करतो, 'अहो, ते अवतारी पुरुष होऊन गेले. जे होणार ते झाले. त्यास उपाय काय ? सद्दी फिरली म्हणजे क्षण लागत नाही. देव देणार त्याला देतो. त्याचे मनात आले म्हणजे पाहिजे तसे घडते.' (पत्र क्र. ५५) 'ज्ञान म्हणजे काय हेच लोकांस ठाऊक नाही. इंग्लंडातील थोरली सनद, पार्लमेंट, फराशीस यांची राज्यक्रांती, रूमचे राज्याचा नाश, अमेरिका खंडात युरोपियन लोकांची वस्ती. लोकसत्ताक राज्य, या शब्दांचा अर्थही बहुत हिंदु मनुष्यांस ठाऊक नसेल. पृथ्वीवर काय