पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४२ : शतपत्रे

ठाई निष्ठा पाहून ईश्वर आनंद पावेल, यात संशय नाही. त्याने जी पदवी आपल्यास दिली आहे, तिचा त्याग करण्याचा हेतू काय ? ईश्वर असा क्रूरपणा आपण निर्माण केलेल्या प्राण्याजवळ करणार नाही. कारण असे जर असते, तर मनुष्यास इतकी जास्ती अक्कल त्याने कशास दिली असती ? सर्व सारखेच केले असते. परंतु त्याचा हेतू हाच की, त्या अकलेचा उपयोग कसा करतो आणि जी जी कर्मे मी त्याच्या वृत्तीवरून व बुद्धीवरून त्यांस सुचविली आहेत, ती ती तो यथास्थित करतो की नाही! हेच ईश्वर पहात असेल, असे अनुमान सिद्ध आहे.
 वैराग्यास काही आधार नाही. आणि तेणेकरून ईश्वरप्राप्तीही नाही, किंबहुना ईश्वरक्षोभ मात्र होईल, असे दिसते. याप्रमाणे बुद्धीकरून परलोकासंबंधी जो विचार झाला आहे, तो लिहिला आहे.

♦ ♦


नाना पंथ

पत्र नंबर २७ : २७ आगस्ट १८४८

 सांप्रत हिंदुस्थानात अनेक मतांचे व जातीचे लोक आहेत. त्यांतील काहींचा इतिहास लिहितो.
 हिंदू लोकांस तर आपले देशातील वर्तमानाची खबर नाही, परंतु बाहेरील पुष्कळ लोक येथे येऊन राहिले आहेत. प्राचीन काळी हिंदू लोक आता आहेत, तसे नव्हते. ते परदेशांत जात-येत होते. अलीकडे मात्र त्यांचे असे झाले की, जसा एखादा धाव घेता घेता थकून पुराण प्रसिद्ध मुचकुंदाप्रमाणे निद्रा करितो, तसे या लोकांचे झाले आहे. बहुत काळपर्यंत सर्व देशाहून हिंदुस्थान प्रमुख आणि पराक्रमी, असा मान पावून हल्ली निद्रिस्त झाले. आता या दीर्घ निद्रेतून ते दुसरे कोणतेही उपायेकरून जागृत झाले नाही. तरी दरिद्राजनें करून तरी जागृत होतील. यात संशय नाही.
 (१) एक हजार वर्षांच्या पूर्वी क्रिस्तियन धर्म युरोपखंडात वृद्धिंगत झाला. व बहुत लोक तो धर्म अंगीकारून देशोदेशी गेले. तेव्हा किती एक किरिस्ताव हिंदुस्थानातही मलबारदेशी आले व त्यांनी आपले धर्मात किती एक लोक आणले. ते अद्यापि मलबारात आहे. त्यांचे नाव सेंट वेमी किरिस्ताव.