पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १४१

 परंतु जापेक्षा मनुष्याचे जन्मास घातले आहे, त्यापेक्षा असे दिसते की, आपण विवाह करावा, स्त्री करावी व स्त्री असली तर तिने भ्रतार करावा. प्रजा होईल, तिचे संरक्षण करावे. अतिगरीब यांचे पोषण करावे. मनुष्यासारखे वागावे विचाराने चालावे. जे उत्तम आहे, ते करावे. इतर लोकांस उपकारांनी मैत्र करावे. जे आपले हातून यथाशक्ती होईल ते कल्याण करावे. लोकांचे व आपले कुटुंबाचे हित करावे. सदाचरणाने वागावे. अनीतीने वागू नये, नम्रता धरावी. राग, लोभ, मूर्खपणा करू नये. विनाकारण कोणाला उपद्रव करू नये. प्रपंचसंबंधी नानाप्रकाराची दुःखे व सुखे आली तर तेणेकरून प्रमाद किंवा ग्लानी होऊ नये. अशा रीतीने वागून यथाशास्त्रसुख अनुभवावे. अशा मनुष्यास आम्हास वाटते की, वैराग्यापेक्षा अधिक श्रेय आहे.
 वैराग्य हे मूर्खपणा आणि ईश्वराने जे दिले व ज्याकरिता मनुष्य-देह केला, त्यांस टाकून जनावराप्रमाणे रानात फिरणे आहे; कारण जे कर्म आपणास सांगितले आहे, ते न केले तर आपले जन्माचे सार्थक होत नाही. जन्माचे सार्थक म्हणजे ज्याकरिता जन्म घेतला, त्याचे सर्व अर्थ म्हणजे हेतू परिपूर्ण करणे. आता प्रथम प्रथम हेतू हाच की; ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये या सर्वांचे यथास्थित व्यापार करणे व शास्त्रयुक्त चालणे व आश्रमाप्रमाणे व वर्णाप्रमाणे वागणूक करणे. थंडी लागू नये म्हणून ईश्वराने कापूस निर्माण केला आहे. आणि आम्ही जर आपले शेतात पिकवून, त्याचे वस्त्र करून, त्यांस अनुभवविले तर आम्ही काही पातक केले, असे होईल काय ? इतके खरे आहे की, चोरी करून दुसऱ्याचा कापूस आणू नये व लोभाने कोणाचे वस्त्रहरण करू नये; कारण जसा आपला जीव तसा दुसऱ्याचा आहे. जशी तुम्हास तुमचे मालाची चोरी आवडत नाही, तशी दुसऱ्यास आवडत नाही. दुसऱ्यास काय आवडत नाही, ते करू नये. जमिनीची चाकरी करून जे मिळेल, ते खाण्यास आपल्यास सर्वोपरी अधिकार आहे. आणि त्यात दोषही नाही. यात जे दोष मानतात, ते आपल्या विचाराचा उपयोग करीत नाहीत; म्हणून त्यांस मूर्खपणाने 'जर तुम्हास मी पाहिजे असेन, तर तुम्ही सर्व सोडा' अशी ईश्वराची आज्ञा आहे, असे वाटते.
 ज्या नवऱ्याने आपले स्त्रीस दागिने दिले आहेत, तो नवरा तिला असे म्हणणार की नाही, 'जर तुला माझी आवड असेल, तर आपले हातातील बांगड्या देखील फोडून टाक.' शहाणा नवरा असे म्हणेल काय ? नाही. तिला जे दागिने आपण दिले, ते घालताना पाहून तो फार संतोष पावेल. कारण दागिने देण्याचे कारण तेच होते. तद्वत् मनुष्यास आपले कर्माचे व नीतीचे