पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १४३

त्यांची चाल व वर्तणूक बहुत करून हिंदूंप्रमाणेच आहे. म्हणजे त्यामध्ये ब्राह्मण, शूद्र अशा जाती आहेत व परस्पर लग्ने होत नाहीत. धर्म मात्र हिंदूंचा नाही. पुढे पोतुगीज लोक इकडे येऊन त्यांनी गोव्यात ठाणे बसविले. त्यानंतर त्यांनी गरीबगुरीब लोकांस जबरीने व द्रव्याने आपले धर्मात आणिले, व ते बहुतकरून युरोपियन लोकांप्रमाणे वागतात. असे किरिस्तावांचे दोन इतिहास आहेत.
 (२) अरबस्तानात महमदी धर्म चालू होऊन मुसलमान झाले, तेव्हा किती एक बादशहाही मुसलमान झाले आणि आपले रयतेस मुसलमान होण्याकरिता इजा देऊ लागले. त्याकाळी इराण देशात जरदस्ताचा अग्निपूजेचा धर्म चालत होता. तेथील बादशहा मुसलमान होऊन रयतेस उपद्रव करू लागला. तेव्हा तेथील जे धर्मतत्पर लोक होते, ते जहाजात बसून हिंदुस्थानात सुरतेस आले; तेथील राजा हा समुदाय पाहून भयभीत झाला व पुढे त्याने त्याजपासून तरवार धरणार नाही, म्हणून करार लिहून घेऊन आपले प्रांतात राहू दिले. त्यांस सरासरी आठ-नऊशे वर्षे झाली. ते पारशी लोक हल्ली आपली पहिली भाषा सोडून गुजराथी भाषा बोलून इकडील लोकांप्रमाणे राहतात. व त्यांनी किती एक इकडील चालीही धरल्या आहेत. त्यांचे धर्मपुस्तक जेंद अवेस्ता हे मात्र मूळचे भाषेत आहे.
 (३) जेव्हा मुसलमानी धर्म चालू झाला, तेव्हा त्या धर्मातील पुष्कळ लोक इकडे येऊन धर्म शिकवू लागले, त्यात एक मौलवी अरबस्तानातून गुजराथेत आला व आपली जाती व धर्म छपवून एका स्वामीजवळ शिष्यात राहिला. व तेथे त्याने हिंदू धर्माचा अभ्यास केला. आणि मग त्या स्वामीस बोध करण्यास आरंभ केला. व आपला धर्म प्रतिपादन केला. तेव्हा स्वामीने तो धर्म खरा समजून आपले शिष्यासहित स्वीकारला ते लोक बोहारी झाले. या गोष्टीस पाचशे वर्षे झाली. गुजराथी भाषेत बोहारी या शब्दाचा अर्थ व्यापारी असा आहे. हे मूळचे गुजराथेतील हिंदूच होते. पुढे बाटून मुसलमान झाले.
 (४) हिंदुस्थानात पूर्वी एकही मुसलमान नव्हता. परंतु मुसलमानांनी स्वारी करून हा मुलूख काबीज केल्यावर ते लोक हा देश चांगला पाहून इकडून गेले नाहीत. येथेच आपल्या सैन्यासहित राहिले. ते लोक हल्ली सर्व हिंदुस्थानात इकडील लोकांत मिसळले आहेत. रोहिले व पठाण हैद्राबादेस राहिले व लखनौ आणि दिल्ली या ठिकाणी मोगल राहिले.
 (५) कोळी, गोंडवनातील गोंड व भिल्ल हे लोक बाहेरील देशातून इकडे आले नाहीत. हे या देशाचे मूळचे मिराशी आहेत, असे दिसते; कारण संस्कृत भाषेचा यांचे भाषेत लेशही नाही. व हिंदू धर्माची गोष्ट त्यांस काही