पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१४० : शतपत्रे

क्षणभर असो अगर घटकाभर असो, स्नान संध्येत किंवा प्रार्थनेत आणि नामस्मरणात घालवा. म्हणजे त्यातच अनंत वर्षे तपश्चर्या केल्याचे पुण्य आहे. संपूर्ण जग ईश्वराने निर्माण केले आहे व त्याची व्यवस्था होण्याकरिता सूर्य-चंद्र, रात्र-दिवस, प्रत्येक जिवाचा भक्ष, रोगास औषध व मनुष्यास विचार आणि थोरपणा इतकी दिली आहेत. त्याचे कारण असे आहे की, ज्या ज्या ठिकाणी जे जे व्हावयाचे; ते यथास्थित होऊन मनुष्याने सर्वदा ईश्वराचे उपकार, शहाणपण, नेम व रचना यांची आश्चर्यकारक स्तुती करून रमत असावे. सूर्य उगवला असता निद्रा करावी किंवा रोग झाला असता औषध घेऊ नये, अगर मनुष्य झाला असता विचार टाकून देऊन जनावरांसारखे फिरावे, असे विचारास योग्य दिसत नाही. यास्तव उत्तम हेच की मनुष्याने आपले कर्म करावे.
 श्रीकृष्णाने गीतेच्या ठाई हाच अभिप्राय अर्जुनास सांगितला आहे. अर्जुन विषाद पावून वैराग्य घेत होता. तेव्हा कृष्णाने त्याची समजूत केली की, 'अरे षंढा, तू भितऱ्यासारखा वैराग्य काय घेतोस ? जे आपले कर्तव्य आहे, ते कधीही टाकू नको. त्याचे आचरण कर. आणि सुखदुःख मात्र मानू नको. वैराग्य हे मूर्खपण आहे. आशा व दुःख जे लाभालाभापासून होते ते मात्र सोडावे. परंतु संसारी जे आपले कर्म लोकांस प्रगट होऊन चालत आले आहे, ते टाकू नये.' या उपदेशावरून जन्माचे सार्थक कसे होईल, याचे उत्तर सहज निघत आहे. आपण काय करितो, वस्त्रप्रावर्ण नेसतो, खातो, पितो व कुटुंबाचे पोषण करितो. हे सर्व व्यर्थ आहे, येणेकरून ईश्वरप्रीति होत नाही, असे जे म्हणतात, त्याचे मत ईश्वरी वचनास विरुद्ध व विचारासही विपरीत आहे, कारण पृथ्वीवर अनेक मनुष्ये निर्माण झाली आहेत, अनेक देश आहेत, त्यात आपण एक मनुष्य आहो. तेव्हा या जगत्समुदायात आपल्यास अनेक प्रकारचे संबंध प्राप्त झाले आहेत. त्यांचा त्याग करणे ठीक नाही व हा केवळ भित्रेपणाच होय, ज्यास संसार चालवावयास धैर्य नाही, तो पुढे काय करणार ? संसार म्हणजे यत्किंचित गोष्ट आहे व या आयुष्यात थोड्याचा विचार ज्यास होत नाही, त्यांस अगम्य ईश्वराचा विचार कसा समजेल ? ज्या देशात ईश्वराने आपणास घातले आहे, त्या देशात आपली योग्यता व बुद्धी येणेकरून आपण काय करावे, याचा विचार करावा आणि योग्य असेल, ते करावे.
 वैराग्यापेक्षा संसार सुयुक्त रीतीने चालविला असता बरा. कारण जर ईश्वराचे मनात आपल्यास रानटी व अविचारी करण्याचे असते, तर त्याने वाघाच्या किंवा दुसऱ्या काही रानवट जनावराच्या जन्मास घालून डोंगरात राहणारे केले असते.