पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ५

या पायाभरणीच्या कार्याचे श्रेय बव्हंशी लोकहितवादींना व त्यांच्या शतपत्रांनाच द्यावे लागेल. अर्वाचीन महाराष्ट्राच्या जीवनात 'शतपत्रां'ना असे अनन्यसाधारण स्थान आहे.
 इंग्रजांचे राज्य येथे प्रस्थापित झाले त्या वेळी येथल्या समाजाचे नेतृत्व ज्यांच्याकडे होते ते लोक म्हणजे ब्राह्मण व सरदार, जहागीरदार हे होत. त्यांना त्या प्रारंभीच्या अव्वल इंग्रजी काळात फार वाईट दिवस आले होते. त्यांची सत्ता, त्यांचे वर्चस्व व त्यांची प्रतिष्ठा ही तर नष्ट झालीच होती, पण त्यांच्यातील बहुतेकांना दारिद्र्य, दैन्य प्राप्त झाले होते. पण हे सर्व काय घडत आहे, कशामुळे घडत आहे याची खरी कारणमीमांसा करण्याचे सामर्थ्य त्यांच्या बुद्धीला नव्हते. कलियुगामुळे, पापाचरणामुळे, ईश्वरी क्षोभामुळे हे झाले आहे, असे त्यांना वाटत होते. आणि पूर्वी रावण माजला होता पण रामाने त्याचा नाश केला, यादव माजले होते त्यांचा ब्राह्मणशापाने संहार झाला तसाच आताही होईल, असाच कोणी अवतारी पुरुष जन्माला येऊन साधूंचा प्रतिपाळ करील व दुष्कृत्यांचा विनाश करील, अशी भाबडी श्रद्धा मनात बाळगून ते बसले होते. इतिहासाच्या अभ्यासाने, तर्काने, बुद्धीने या घटनांची चिकित्सा करावी, समाजाच्या उत्कर्षापकर्षाच्या नियमांच्या आधारे या अवदशेचे विवेचन करावे, भौतिक दृष्टीने कार्यकारणभावाचा विचार करून आपल्यावर आलेल्या या घोर संकटाचे स्वरूप निश्चित करावे ही ऐपतच त्या नेत्यांना नव्हती. कारण तशी परंपराच या देशात नव्हती. त्यांची सर्व मीमांसापद्धती पौराणिक होती, आध्यात्मिक होती. लोकहितवादींचे असामान्यत्व हे की त्यांनी भौतिक कार्यकारणभावाच्या दृष्टीने प्राप्त परिस्थितीचे निदान करण्याची नवी परंपरा या देशात सुरू केली. एखाद्या अत्यंत विद्वान, निष्णात, अनुभवी, आपल्या विद्येत पारंगत असलेल्या वैद्यराजाने अंथरुणाला खिळून गेलेल्या रोग्याची तपासणी करावी व सूक्ष्म चिकित्सा करून रोगनिदान करावे आणि मग त्याला रोगमुक्त करण्यासाठी प्रभावी औषधयोजना करावी त्याचप्रमाणे रुग्ण अशा भारतपुरुषाच्या बाबतीत लोकहितवादींनी केले. त्यांनी शतपत्रे लिहिली त्या वेळी ते अवघे २५ वर्षांचे होते, पण त्या वयातही समाजाच्या आयुर्वेदात ते पारंगत झाले होते. इतिहास, राज्यशास्त्र, अर्थकारण, यांच्या अभ्यासानेच त्यांना ही पारंगतता प्राप्त झाली होती आणि या अपूर्व विद्येच्या साह्यानेच त्यांनी आपल्या समाजाची नाडी पाहून, त्याच्या शरीरातील नसन् नस तपासून त्याच्या रोगाबरोबर निदान केले आणि तितकीच अचूक उपाययोजनाही सांगून टाकली. ते रोगनिदान व ती उपाययोजना हाच