पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३० : शतपत्रे

आजपर्यंत लिहितात.
 कोणत्या दशग्रंथी ब्राह्मणाने व कोणत्या षड्शास्त्री पंडिताने यंत्राविषयी विचार केला आहे ? फार झाले तर शिल्पाविषयी एक जुने पुस्तक काढतील आणि म्हणतील की, हे पहा आमचे यंत्रज्ञान. आत पाहिले तर दुसरे काही नसते. परंतु मंगळवारी घर बांधू नये, बुधवारी मोरी उकरू नये, त्रिकोण आला तर जागा टाकावी, जेथे समभाग येईल, तेथे घर बांधावे, रोहिणी नक्षत्रावर लाकडे तोडावी, हेच ज्ञान त्यात सापडेल. त्या ज्ञानाप्रमाणे त्यांनी लोकांस वेड लावून दिले आहे व जो तो मुहूर्त पहाता पहात दमतो. मुलास बायको कशी का असेना, परंतु मुहूर्त चांगला पाहिजे. जे अज्ञान लोकांत पंडितांनी पसरून दिले आहे.
 चवथे, राज्यप्रकरणी ज्ञान पाहिले तर मनास येईल तसे राज्य करावे. या नियमावाचून कोणता नियम त्यांस ठाऊक आहे ? लोकांमध्ये बंदोबस्त व उद्योग कसा होतो व त्यांची वृद्धि, उत्पत्ती व नाश कोणत्या कारणाने होतात व फौजेचे नियम कसे असावे, येविषयी ज्ञान कोणत्या पंडितास आहे ? हे ज्ञान नाही म्हणून पंडित उद्योग करावयास प्रतिकूल आहेत, व विचार करावयासही प्रतिकूल आहेत व देशात द्रव्य कसे येईल, याविषयी तर त्यांस धुळाक्षर शिकविले पाहिजे. कोणत्या पंडिताने राज्याविषयी ग्रंथ लिहिला आहे ? व राज्य करण्याची युक्ती अमुक चांगली, असे दाखविले आहे ? फक्त पंडितांनी इतकेच लिहिले आहे की, जे जे राजे झाले; त्यांची खुशामत करून त्यांस आकाशांत नेले आहे.
 या गोष्टीची प्रचीत पहावयास दूर जावयास नको. बाजीराव याने पुण्यात शास्त्रांचा एक मोठा कळप बाळगिला होता; परंतु त्याने कोणते कल्याण केले ? द्वादशीचे ब्राह्मणभोजन वाढविले. कोणतेही पाप केले, तर पैका घेऊन निर्मळ म्हणून सांगत होते. "सर्वत्र विजयी भव" म्हणून आशीर्वाद देत होते. त्याणी कांठाळे बसले. रोज पाच- चार स्नाने घालीत होते. एवढीच गोष्ट त्याणी केली, धर्म सांगितला नाही. राज्यव्यवहार सांगितला नाही, विद्या सांगितली नाही, लोकांस लुटून त्यांस शालजोड्या द्याव्या, म्हणजे खंडीभर आशीर्वाद व दोन लाख कोट्या करून वाद करीत होते.
 पाचवी गोष्ट, परदेशात प्रवास करून, तेथील खबर लोकांत प्रसिद्ध केली पाहिजे, तर लोकांचे ज्ञान वाढते. याविषयी लक्षावधी ग्रंथ इंग्रजीत आहेत. त्यांपैकी एखादा तरी त्यासारखा संस्कतात आहे की काय ? पंडितांस फार झाले तर शे पन्नास कोसांतील प्रवास घडला असतो. बाकी त्यांच्या डोळ्यांपुढे