पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १३१

अंधकार असतो. पृथ्वीविषयी व समुद्राविषयी हे पंडित लोक बोलत असले, म्हणजे जसे इस्पितळातील लोक बडबडतात, त्याप्रमाणे त्यांचे ज्ञान नजरेस येते.
 सहावे पदार्थज्ञानही बराबर संस्कृतात नाही. भलत्याचा गुण भलताच व भलतीच उत्पत्ती सांगितली आहे. सोने जंबुनद आहे, म्हणून सांगितले, ते कोठे आहे ? पंडितांनी त्यांची आंगठी कधी केली आहे काय ? तसेच सिंह, शार्दूल, शरभ या जनावरांची वर्णने मनास येईल तशी केली आहेत; परंतु ती पंडितास खरी वाटून खरा शोध करण्यास देखील ते प्रतिकूल आहेत. याप्रमाणेच ज्योतिष, वैद्यक, रसायन या सर्व ज्ञानाची व्यवस्था आहे. फक्त संस्कृतात शब्दशास्त्र मात्र आहे. म्हणजे व्याकरण, अलंकार, न्याय इत्यादी.
 परंतु जे इंग्रजी भाषेत ज्ञान व विद्या आहे त्यातला या भाषेत एक गुंजदेखील अंश नाही आणि या शब्दज्ञानाचा उपयोग कोणता की, पंडित सभेत जमून बडबड करतात. त्यापासून लोकांस काही उपयोग नाही, अर्थ नाही, धर्म नाही, हा वितंडवाद. परंतु पंडितास हीच मोठी विद्या वाटते व तिजवर ते मिरवितात. परंतु त्यांस असे वाटत नाही की, आमचे ज्ञान निरुपयुक्त व पोकळ आहे, व याजवर लोकांस आता फसवू नये. लोकांस आपले कल्याणाकरिता उपयुक्त ज्ञान मिळवू द्यावे, असे वाटत नाही. बुडत्याबरोबर काठावरच्यानेही आत पडावे, असा त्यांचा बेत आहे.
 परंतु हा वेडेपणा सोडून द्यावा व पुनर्विवाहादि विषयावर मूर्खासारखे बरळू नये. पंडितांनी या हिंदू लोकांचे आजपर्यंत इतके खाऊन त्यांचे कल्याण काय केले ? राहू चंद्रास खातो. ब्राह्मणास दिले म्हणजे पुण्य, ब्राह्मण हेच देव, हेच त्यांस सांगून आपल्यासारखे मूर्ख केले.

♦ ♦