पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १२९

ज्ञान काही नाही. संस्कृत भाषेतील खुळे याचे मनात भरली आहेत. ती झाकून ठेवतील तर फार बरे होईल.
 (३) संस्कृताचा इतकाच उपयोग आहे की, लोकांमध्ये भ्रांती उत्पन्न व्हावी. व जो जो मनुष्य त्यात प्रवीण होतो, तो तो अज्ञानसमुद्रात खोल खोल जात असतो; असे अजून कोणी म्हणेल, पाठशाळा सरकारने कशास चालविली आहे ? तर शाळेपासून जे फळ आता दृष्टीस पडू लागले आहे, तेच येईल, असे पूर्वी वाटले नवते. तेवहा असे वाटत होते की, कोणीकडून तरी विद्येची गोडी या लोकांस लागेल, नंतर लोकांस जी विद्या म्हणून वाटते, त्यातच अनुपान करून चांगली विद्या शिकवावी. अशा बुद्धीने हे बीज घातले. त्यांस दक्षिणादिकेकरून जलसिंचन केले. परंतु या वृक्षास इच्छिले फळ आले नाही. उलटे आणखी अज्ञान वाढले. अस्तु. साधारण संस्कृताविषयी बोलण्याचा प्रसंग आहे, यात इतर गोष्ट नको.
 (४) संस्कृतात चांगली विद्या नाही व उपयुक्त ज्ञान नाही, हे सर्व विद्वानांनी ठरविले आहे. परंतु सभासदांची खातरजम करण्याकरिता लिहिणे जरूर आहे. प्रथम संस्कृतात इतिहास नाही. मागाहून राज्ये कशी झाली ? व ती बुडाली कोणत्या कारणाने ? राज्ये किती होती ? मुसलमान आले कधी ? त्याचे पूर्वी राज्य कोणी केले ? येविषयी पंडितांचे ज्ञान व नांगरहाक्याचे ज्ञान सारखे आहे. कलियुगास पाच हजार वर्षे सरासरी होत आला. त्याचा इतिहास आहे कोठे ? याचे उत्तर पंडित काय देतील ?
 दुसरे, संस्कृतात भूगोल नाही. पंडितास पुसा की, रूम कोठे आहे ? व अरबस्तान कोठे आहे ? व हिंदुस्थानची हद्द कशी व लोक किती ? व लांबीरुंदी किती ? तर तो हातच जोडील, आणि ठाऊक नाही म्हणेल. पंडितांचे ज्ञान इतकेच की, मेरू भूमीच्यामध्ये आहे. लक्ष योजने उंच आहे. सिद्धपूर आहे. स्वर्गाची वाट हिमालयावर आहे. गंगा ही देवता जिवंत आहे, तशीच यमुनाही आहे. हे त्याचे भूगोलसंबंधी ज्ञान आहे.
 तिसरे, संस्कृतात यंत्रज्ञान नाही. आजपर्यंत कालिदासासारिखे पंडित झाले, मग या 'कल्याणोन्नायक' गरिबाची कथा काय ? परंतु कोणी पंडिताने यंत्र कधी केले आहे ? यंत्राची सुधारणा केली आहे ? जे जाते व्यासाचे वेळेस होते, तेच आता आहे. जो नांगर पांडवांचे राज्यात होता, तोच आता आहे. पंडितांनी कोणता ग्रंथ यंत्रावर विचार करून लिहिला आहे ? पंडितांनी कधी ग्रंथ छापले आहेत ? कागद करीतात, त्यापेक्षा चांगले करण्याची युक्ती लोकांस दाखविली आहे? कर्नाटकात ताडपत्रावर रामराज्यापासून लिहीत आले, तसेच