पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२८ : शतपत्रे

चांगल्या समजुतीने भाषादेखील सुधारेल; परंतु मुळी एकदा संस्कृताच्या झऱ्याचे पाणी जो प्याला, त्यांची भ्रांती जावयास नव्वद वर्षे शिकविले, तरी उपयोग नाही, हे निश्चित आहे. याविषयी कोणी भ्रांतीच धरू नये. सुधारलेल्या संस्कृत भाषेचा मात्र उपयोग पडावा इतके करावे, अधिक नको. त्यांतील ज्ञान अगदी उपयोगी नाही. जी भाषा प्रथम मुलास शिकवावी, त्या भाषेतील ग्रंथाप्रमाणे त्याचे मन होते.
 याकरिता फार सुधारलेली इंग्रजी भाषा किंवा तीतील ग्रंथ शिकलेला माणूस ठेवून, त्याचे हातून इंग्रजी ग्रंथाचे ज्ञान मुलास शिकवून तसे पंतोजी तयार करावे, म्हणजे फार उपयोग होईल. संस्कृताने आधी अनर्थ केला आहे. व याने आणखी अधिक अनर्थ होईल, हे पक्के मनात वागवावे आणि खोटा अभिमान धरू नये. संस्कृत भाषेतील ग्रंथ व इंग्रजी भाषेतील ग्रंथ यांची तुलना करून पाहावी, म्हणजे संस्कृताचा अभिमान जाईल.

♦ ♦


संस्कृत विद्या

पत्र नंबर १०१

 पुण्यातील 'कल्याणोन्नायक मंडळी'त लोक आहेत, व त्याचे ज्ञान कसे आहे, हे मला आजपर्यंत ऐकून ठाऊक होते, व मला फार आशा होती की, हे लोक आपली योग्यता जाणून आपले उत्कृष्ट ज्ञान बाहेर काढणार नाहीत; परंतु आपली फजिती करून घेण्यास तेच प्रथम प्रवर्तले, यास्तव त्यांस उत्तर दिले पाहिजे. नाही तर ते असे समजतील की, पृथ्वी निःक्षत्रिय झाली आणि जरी त्याचे लिहिणे उघड वेडेपणाचे आहे, तत्रापि सूज्ञ जनांनी त्याचा धिक्कार करू नये.
 (२) 'कल्याणोन्नायक मंडळी'तील सभासद संस्कृत विद्येचा पक्ष घेतात; परंतु हा पक्ष व्यर्थ आहे. कारण की, संस्कृतात फार विद्या आहे. असा सांगून लोकांस पंडित प्राचीन काळी फसवीत होते; परंतु आजचा काळ असा आहे की, संस्कृताची उघडीक होऊन पंडितांचे सर्व ज्ञान बाहेर पडले आहे. असे असता हे सभासद बापडे सर्व पाठशाळेतील पंडित आहेत; परंतु त्यांस वास्तविक