पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १२७

ज्याकडे विद्यावृद्धीचे काम आहे. त्याणी म्हणजे बोर्ड ऑफ एज्युकेशन याणीं मराठी पंतोजी तयार होण्याची एक शाळा केली पाहिजे व चांगले ग्रंथ तयार करण्याकरिता तर्जुमे करणाऱ्याची एक मंडळी बसविली पाहिजे.
 आता पहा की, केवळ पगाराकरिता पंतोजी बुके उघडितात; परंतु त्यांस पुसले की, पृथ्वीची छाया पडून ग्रहण होते की काय ? तर म्हणतात, 'छिः ! हे आपले उगाच इंग्रजांचे मत आहे. हे आम्ही पोटाकरिता शिकवतो. दुसरा काही रोजगार नाही; मग करावे काय ?' ही अवस्था पंतोजीची आहे. मग मुले तरबेज कशी होतील ? या जुन्या पंतोजीच्या हाती रसायनविद्या दिली तर काय उपयोग ? त्यांस त्यांतील एक अक्षरदेखील समजत नाही; म्हणून पोरांकडून परीक्षेस हजरी देण्याकरिता उत्तर पाठ करून मात्र ठेवितात; परंतु स्वतः समजून देण्याचे ज्ञान नाही. नवीन निबंध करण्याचे ज्ञान नाही व बुकातील गोष्टी समजून देण्याचे कळत नाही.
 नवे बुक छापून आले, म्हणजे म्हणतात की, 'आली ही पीडा, यात काय आहे ?' असा कंटाळा करून पोरांस शिकविणारे जे लोक त्यांच्या हातून ज्ञान कसे मिळेल ? व्यर्थ पोरांना मात्र मेहनत पडते. वास्तव जशी बुके तयार होतात, तसे पंतोजी तयार झाले पाहिजेत. हे प्रथम काम आहे. ज्याचे मन मुळापासून संस्कृत भाषेतील ग्रंथ वाचून विपरीत ज्ञानाने भरले आहे. ते लोक तर अगदीच उपयोगी नाहीत. त्यांचे हातून फारच अनर्थ होईल. एकदा या विपरीत ज्ञानाची प्रथम समजूत झाली, म्हणजे मन बिघडून जाते, ते ताळ्यावर येणे कठीण पडते. यास्तव त्यापेक्षा अडाणी मनुष्य बरा.
 यास्तव प्रथम जो इंग्रजी शिकलेला विद्यार्थी असेल, तोच पंतोजीचे उपयोगी पडेल. असे तयार होण्याकरिता एक नवीन शाळा व त्याजवर यथायोग्य शिकणारे पाहिजेत, तेव्हा असे लोक तयार होतील. जे संस्कृतचा अभिमान धरतात ते अगदी अज्ञानात आहेत. ते सुधारणेस हरकत मात्र करतील. दुसरी गोष्ट त्यांच्याने व्हावयाची नाही. यास्तव असे पंतोजी तयार करून जुने असतील त्यांस पेनशिने देऊन मुक्त करावे, हे बरे. संस्कृत आजच्या काळी काही उपयोगी नाही व त्यांतील ग्रंथही उपयोगी नाहीत. तेणेकरून लोक अधिक मूर्ख होतील. संस्कृतची योग्यता इतकीच आहे की, ती भाषा सुधारलेली आहे. याजकरिता पंतोजीस ती यावी, हे चांगले.
 परंतु भाषा येऊन अज्ञानवृद्धी झाली, तर उपयोग काय ? याजकरिता हे ना होईल तितके बरे. भाषा चांगली न आली; आणि मन साफ असून समजूत चांगली असली, तर ती पतकरेल व त्याचा उपयोग अधिक पडेल.