पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४ : शतपत्रे

 नवभारताची निर्मिती- इ. स. १८१८ साली पेशवाईचा अस्त झाला. मराठ्यांचे साम्राज्य बुडाले. याला आता जवळजवळ दीडशे वर्षं होत आली. या दीड शतकाच्या काळात भारतात एक अभूतपूर्व क्रांती घडून येऊन नवभारताचा जन्म झाला आहे. त्याच्या आधीच्या हजार दीड हजार वर्षांत एवढे मोठे परिवर्तन भारतात कधीच झाले नव्हते. मुसलमानी आक्रमण, पाश्चात्त्यांमधील डच, फ्रेंच, पोर्तुगीज यांचे आक्रमण याच काळात झाले. इंग्रजही याच काळात येथे व्यापार करीत होते व मुलूख आक्रमीत होते. या आक्रमणामुळे भारतातील प्रत्येक प्रदेशाला, तेथील राज्यव्यवस्थेला, समाजरचनेला, अर्थव्यवस्थेला सारखे हादरे बसत होते. तरी एकंदर समाजव्यवस्थेच्या तत्त्वात फारसा फरक पडला नव्हता. श्रुतिस्मृतिपुराणोक्त धर्माने बद्ध असे जे त्याचे स्वरूप या आक्रमणांच्या आधी होते ते बव्हंशी तसेच कायम होते. पण पेशवाई बुडाली आणि त्यानंतर जी पाश्चात्त्य विद्या येथे प्रसृत होऊ लागली, तिच्या प्रभावाने हा समाज शंभर वर्षांत इतका पालटला की, तत्पूर्वीच्या व या समाजात काही नातेच नसावे असे पाहणाऱ्याला वाटावे. ही जी क्रांती झाली ती भारताला अत्यंत हितावह अशीच झाली. आगरकरांनी म्हटल्याप्रमाणे पूर्वीच्या हजार वर्षांच्या काळात भारताला सतत पाण्यात पडून राहिलेल्या लाकडाचे व हाडकाचे रूप प्राप्त झाले होते. त्याच्यात चैतन्य असे कसलेच राहिलेले नव्हते. त्याचे चलनवलन सर्व थांबले होते. या जुनाट पुरुषाच्या देहात रुधिराभिसरण होतच नव्हते. पण पाश्चात्त्य विद्येमुळे नवी दृष्टी येथल्या धुरीणांना प्राप्त होताच हा समाज पुन्हा जिवंत होऊ लागला. आणि एका शतकाच्या आतच त्याचा कायाकल्प झाला; या सनातन भूमीत नवभारताची निर्मिती झाली.
 या नवनिर्मितीचे महाकार्य करणारे जे थोर पुरुष गेल्या काही शतकांत महाराष्ट्रात होऊन गेले त्यात लोकहितवादी तथा गोपाळ हरी देशमुख यांचे स्थान फार मोठे आहे. दादाभाई, रानडे, विष्णुशास्त्री, आगरकर, टिळक हे नवभारताचे व नव्या महाराष्ट्राचे प्रमुख शिल्पकार होत हे खरे आहे, पण भाऊ महाजन, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग, ज्योतिबा फुले व लोकहितवादी यांनी त्यांच्या आधी क्रांतीची जी पूर्वतयारी करून ठेवली होती तिलाही त्यांच्या कार्याइतकेच महत्त्व आहे हे विसरून चालणार नाही. कोणत्याही क्रांतीला नव्या तत्त्वज्ञानाची, समाजरचनेच्या नव्या मूलतत्त्वांची आवश्यकता असते. त्या तत्त्वांचा मनाशी निश्चय करून समाजात त्यांच्या प्रसाराचे काम धैर्याने, दृढनिश्चयाने व फार चिकाटीने अखंड करावे लागते; तेव्हाच नव्या निर्मितीचा पाया भरला जातो.