पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ३

लोकहितवादींच्या कार्याची उपेक्षा झाली. प्रा. गं. बा. सरदार यांनी 'महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी' या आपल्या पुस्तकात त्यांचा समावेश केला आहे तो याच अभिप्रायाने त्यांच्या व त्यांच्यासारख्याच इतर पंडितांच्या प्रयत्नाने लोकहितवादींच्या कार्याचे खरे स्वरूप आज आपणास कळून येत आहे. ही सुदैवाची गोष्ट आहे. नाहीतर हे 'जुने ठेवणे' आपल्याला आकळले नसते. आज महाराष्ट्रात विष्णुशास्त्री पक्ष व लोकहितवादी पक्ष असे दोन पक्ष दिसतात. त्यांच्यात या दोघांच्या कार्याविषयी तीव्र मतभेद आहेत. प्रत्येक पक्षाची दुसऱ्याच्या कार्याला शून्य लेखावे अशी वृत्ती दिसते. आपणच दोन्ही एकांतिक मते त्याज्य मानून दोघांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यास शिकले पाहिजे.

लोकहितवादींचे विचारधन


 'लोकहितवादींचे विचारधन' या विभागात लोकहितवादींचे भिन्न विषयांवरचे विचार संकलित करून मांडले आहेत. शतपत्रांमध्ये लोकहितवादींनी १०८ पत्रे लिहिली आहेत. त्यांत धर्म, राजकारण, समाजकारण, अर्थशास्त्र, इतिहास, इंग्रजीविद्या, संस्कृत विद्या इ. अनेक विषयांवरचे त्यांचे विचार आले आहेत. हे लेखन प्रासंगिक असल्यामुळे त्यात वरील विषयांवरचे विचार विखरून असे आलेले आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने सोयीचे व्हावे म्हणून त्याचे वर्गीकरण करून भौतिक विद्या, धर्मशास्त्र, जातिभेद, स्त्रीजीवन, इंग्रज आणि राज्यसुधारणा आणि आर्थिक विचारसरणी अशा विभागांत त्या त्या विषयावर विचार संकलित केले आहेत. असे करताना शक्यतो लोकहितवादींच्या शब्दांतच ते देण्याचा प्रयत्न केला आहे, पण विस्तारभयास्तव काही ठिकाणी संक्षेप करावा लागला, काही ठिकाणी दोन-तीन पत्रांतील विचार मांडताना मध्ये निराळी वाक्ये घालून जोडणी करावी लागली. त्या ठिकाणी संपादकीय भाषा आलेली आहे. लोकहितवादींची मूळ भाषा असेल तेथे त्यांचे उद्गार अवतरणात दिले आहेत. पण त्यातही काटछाट करताना कोठे कोठे भाषा बदलली आहे, पण मूळ विचारसरणीला कोठे धक्का लागणार नाही हे धोरण कटाक्षाने संभाळलेले आहे. याशिवाय मधून मधून संपादकीय विवरण आले आहे ते लोकहितवादींच्या विचारधनाचे स्वरूप नीट कळावे म्हणून. लोकहितवादींच्या आधीच्या काळचे मतप्रवाह, पन्नास वर्षांनंतरचे मतप्रवाह, त्यांच्या काळची परिस्थिती, हे सर्व उद्बोधनासाठी आलेले. संपादनातील हे धोरण ध्यानात ठेवूनच विद्यार्थ्यांनी शतपत्रांचा अभ्यास करावा.