पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १११

कोणाचेही उपयोगी नसोन तिचा विद्यार्थी केवळ भट होईल किंवा विलक्षण तऱ्हेचा मनुष्य होईल. याचे कारण त्यातील ग्रंथात फारसे ज्ञान मुळीच नाही. जे आहे ते केवल जुन्या काळचे. त्याचा आता उपयोग काहीही नाही.
 प्रथम या भाषेतील ग्रंथाचे अनुक्रमाने निवेदन करू. प्रथम वेदांतील मंत्रसंहिता आहेत. त्यात पाहिले तर अग्नी, मित्र, वरुण यांच्या प्रार्थनेची सूक्ते म्हणजे प्रबंध आहेत. ते नाना प्रकारचे छंदांनी रचले आहेत. पुढे ब्राह्मणे म्हणून बखरीसारखे ग्रंथ आहेत, त्यात या मंत्राचा उपयोग कसा करावा, या मंत्राने जनावरे मारून यज्ञ कसे करावे, कोणता मंत्र म्हटला तर काय फळ होते, हे सांगितले आहे. या ग्रंथाचे आधाराने ब्राह्मण हे मोठे योग्यतेस पावले. किती एक काळपर्यंत त्यांचे आशीर्वाद, त्यांचे शाप, त्यांची अनुष्ठाने ही मोठी सामर्थ्यवान आहेत, असे लोकांत प्रसिद्ध झाले होते. याजमुळे ब्राह्मण हे हल्ली जसे पंचाक्षरी, औसर अंगास आणणारे, देवाचे साक्षात्कारी, मंत्री, जादूगार, करामती करणारे, अवलिया वगैरे ढोंगी यास लोक मानतात व भितात, त्याप्रमाणे सर्व लोक ब्राह्मणास भीत आहेत.
 राजे राज्य घेण्याकरिता, निपुत्रिक पुत्र होण्याकरिता, गरीब धनप्राप्तीकरिता, रोगनाशनार्थ, शत्रुनाशनार्थ ब्राह्मणास बोलावून त्यांस अनुष्ठाने, जप, तप, मंत्रसाधने करावयास सांगत. 'लोकांस असे वाटत होते की, ब्राह्मणाचे हाती सर्व आहे व वेदाचे मंत्रास सामर्थ्य आहे. देवांपेक्षा ब्राह्मणांचे मंत्र जबरदस्त. ब्राह्मण हाक मारतील, तेव्हा देव हात जोडून येतात; राक्षस मंत्रांनी पळतात. ही समजूत अद्यापि लोकांमध्ये आहे.
 परंतु ब्राह्मणांनी पूर्वीचे तापसस्वरूप व जटा, व्याघ्रांबरे, दाढ्या, भस्म, दर्भ, वनवास इत्यादी भयंकर प्रकरणे सोडल्यामुळे त्यांचे तेज कमी झाले. लोकांस असे वाटू लागले की, हे आपल्यासारखेच आहेत; परंतु पहिले हे मोठे उग्र होते. आताही असे उग्र कोणी आहेत, त्यांस अडाणी लोक भितात याप्रमाणे हे जादू प्रकरण माजले. पुढे तो काळ जाऊन शास्त्रे उत्पन्न झाली. त्यात वेदान्त मत निघाले. त्याणे हे पूर्वीचे ढोंग सर्व खोटे असे ठरविले. अनेक देवांची अनुष्ठाने खोटी, असे प्रसिद्ध केले. एकच परमेश्वर व त्याचे मनन करणे हेच श्रेयस्कर, असे सांगितले.
 त्याजवर बौद्ध मत झाले, त्याणे तर वेदाचा अगदीच उपहास केला व त्यातील उग्र म्हणजे हिंसा, वपा, याग इत्यादिक कर्मांची निर्भर्त्सना करून दयाधर्माची प्रसिद्धी केली. त्यानंतर ते मत रद्द होऊन पुनः ब्राह्मण-मत उभारले. ते पूर्वीप्रमाणे तर कोठून होईल ? त्यांस जखमा फार लागल्या म्हणून थोडेसे