पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/११८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११२ : शतपत्रे

उभे राहिले. त्याची भर जवानी गेली. पुराणे म्हणून ग्रंथ झाले. त्यात काही वेदान्त, काही भक्ती, काही वैदिक कर्मे, काही नवीन देवता, नवीन व्रते, दाने वगैरे लिहिली. या पुराणकर्त्यांचा हेतू असा होता की सर्व वाद तोडून कोणी कोणत्याही मताने वागला, तरी चिंता नाही. यास्तव सर्व मतांचा संग्रह त्याणी केला.
 त्यानंतर काही काळ गेल्यावर निबंधग्रंथ झाले. त्याने पूर्वीचे सर्वच ग्रंथ ईश्वरी असे मानून, सर्व ओझे डोकीवर घेतले. तेव्हा आता संस्कृत शिकणाऱ्याचे हाती कोणते ज्ञान येते, हे पाहिले पाहिजे. तर हा विचार या ज्ञानाने तीनचार हजार वर्षांचा जुना होता, त्याचा हल्लीचे काळात जन्मलेलेपणा जातो. कसा म्हणाल तर त्यांस म्हटले की, लंकेत कोलंबो शहर आहे, तर हा म्हणतो की, लंका कोणास सापडावयाची नाही. तिच्या सभोवते सुदर्शन फिरत आहे. त्यांस विचारले की, तापी नदीचा उगम कोठे आहे ? तर तो म्हणतो की, ती यमाची बहीण असे पुराणांत लिहिलेच आहे. याप्रमाणे पुराणे वाचून त्याचे मनात अनेक कल्पित कादंबऱ्या भरून, त्यांस हल्ली सृष्टी आहे, त्याहून वेगळी दिसते. संक्रांत हे सूर्याचे राशिक्रमण हे तो जाणतच नाही. एक म्हणतो ती रेड्यावर बसून दक्षिणेस जाते आहे. आणि ती दीडशे कोस लांब आहे. आणि तिच्या पाठीमागे एक दुसरी बाई किंकरान्त आहे. तेव्हा या मनुष्यास असे वाटते की, अलौकिक ज्ञान जे कोणास ठाऊक नाही, ते मला या पुराणामुळे ठाऊक झाले आहे. या अभिमानात तो असतो. वास्तविक पाहिले, तर त्याचे ज्ञान एक कपर्दिकेच्या किंमतीचे नसोन त्याचे व इतर लोकांच्या नाशास कारण झाले.
 त्यानंतर दुसरा भाग म्हणजे मंत्रशास्त्र. हे जर त्याणें पाहिले, तर नाना प्रकारची अनुष्ठाने, नरसिंह, शरभ, वेताळ, योगेश्वरी इत्यादी देवता व त्यांस बोलावण्याची रीत व त्यांस प्रसन्न करण्याचे जप, त्यांस माहीत होतात. आणि तो आपले अंगी असा ताठा आणितो की, मी काय तो मोठा, मजमध्ये मोठे सामर्थ्य आहे. मी पाहिजे त्यांस पुत्र देईन, दौलत देईन, शत्रू मारीन; पण त्याचे हाती काही नसते. हा स्वप्नासारखा भ्रमात असतो. ते ग्रंथ वाचून त्यांस भ्रम पडतो. करावयास जातो, तो त्यात काही नाही ! बरे, आणखी संस्कृतविद्येच्या दुसऱ्या भागात जाऊ. जर तिचा अभ्यासी याज्ञिक झाला तर त्यांस असे वाटते की, मला अमुक शास्त्र म्हणता येते, तमुक शास्त्र म्हणता येते, पशू मारावे कसे, त्यांची अंगे कशी काढावी, हा खाटिकपणा येतो. यज्ञाचे मंडप कसे घालावे, त्याचे मागेपुढे मंत्र कसे ओरडून म्हणावे, हे ठाऊक आहे. त्याचे