पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११०: शतपत्रे

किंवा काच करण्याची यंत्रे आणून कारखाना घातला, तर हजारो माणसांचा रोजगार उत्पन्न होऊन खावयास मिळेल आणि सुख होईल. नंतर काशीयात्रेपेक्षा ते रुपये सार्थकी गेले, असे म्हणावे की नाही ? परंतु हे लोकांस कळत नाही. मनास येईल तसे खर्च करीतात. यात्रा वगैरे कराव्या; परंतु जिवंत लोकांस सुखी करण्याचे टाकून यात्रा कराव्या, हे उचित नाही व याने काही हित होत नाही. फक्त मूर्खपणा, आळस व अनुद्योगीपणा मात्र वाढतो. यास्तव ही गोष्ट सर्वांनी मनात आणून लोकांचे हिताचे धोरणास लागावे, हे चांगले. आजपर्यंत मागील वहिवाट होती, म्हणून जरी खचित आहे, तरी या काळास हे लागू नाही. आजपर्यंत जरी कसेही झाले, तरी त्याचा उपयोग नाही. काळ पाहून कालमानाने व्यवहार चालवावा, हे उत्तम आहे; परंतु या विचारावर लोक येतील तो किती एक काळ पाहिजे व भट भिक्षुक वगैरे यांस विचार व विद्या काय आहे, याचा अर्थ कळणे हे अवघड काम आहे व प्राकृत भाषा सुधारून त्या भाषेत ग्रंथ बहुत होऊन सर्व लोकांस कळले पाहिजेत.
 यास्तव जे लोक या देशाचे कल्याण इच्छिणारे असतील, त्यांनी लोकांची सदरील समजूत दूर करण्याची मेहनत केली पाहिजे व स्त्रियांस शहाण्या केल्या पाहिजेत, म्हणजे लोक ज्ञानचक्षूने पाहू लागतील.

♦ ♦


संस्कृत विद्या

पत्र नंबर ८४ : १ डिसेंबर १८४९

 संस्कृत विद्या मोठी गहन आहे व तिचा उपयोग मोठा आहे, असे लोकांस वाटते. याजमुळे शास्त्री, पंडित वगैरे संस्कृतचे विद्वान यांस लोक मानतात. व वैदिक हे जरी ग्रंथ नुसते पाठ करीतात, तरी निदान पक्ष ते ग्रंथाचे रक्षण तरी करतात. म्हणून त्यांस लोक मानतात.
 परंतु संस्कृत विद्येचे तात्पर्य पाहिले तर त्यात व्यावहारिक उपयोग काहीच नाही, संस्कृत भाषा फार प्राचीन आहे; आणि देव म्हणजे जुने हिंदू त्यांची ती भाषा आहे. व तिजला बहुतांनी शोधून संस्कार देऊन सुधारली आहे, म्हणून तीस संस्कृत म्हणतात, हे खरे; परंतु तिजमध्ये जे ज्ञान वाढले, ते