पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १०९

जसा तांब्या पूर्वी करीत होते, तसाच आता करतात. पोथी जशी पूर्वी लिहीत होते, तशीच आता लिहितात. नवीन युक्ती वगैरे काही नाही. यामुळे छापणे, यंत्रे करणे, तारवे बांधणे वगैरे अनेक विद्या आहेत. त्याचे ज्ञान या लोकांस नाही. त्याणी काही अधिक कल्पना चालविली नाही. जी पूर्वी बुद्धी चालली, तितकीच चालून स्थिर झाली. पूर्वीच्या इतकेच वैद्यशास्त्र, तितकेच गणित, तितकाच भूगोल, तितकाच खगोल याप्रमाणे सर्व तितकेच राहिले, पुढे चालले नाही. मला वाटते फार तर काय, ज्या वस्तऱ्याने हल्ली हजामत करतात, तोच वस्तरा पूर्वी चारपाच हजार वर्षांमागे होता. जसे आज धोतर नेसतो, तेच धोतर पाच हजार वर्षांपूर्वी नेसत होते. नवीन कायदा किंवा राज्यरीती व बंदोबस्त काही एक नाही. सांप्रत फार तर काय परंतु प्राचीन काळाविरुद्ध काही गोष्ट बोलले तर त्यांस अधर्म म्हणतात. ज्या रस्त्याने मागे लोक गेले, त्याच रस्त्याने पुढे जावे, अशी रीती पडून तीस धर्म असे म्हणतात. त्यात काही नवीन कल्पना नको.
 यास्तव ही समजूत मोडून सर्व लोकांस अशी इच्छा उत्पन्न झाली पाहिजे की आम्ही आणखी शोध करू, पूर्वीचे लोकांनी शोध केला. तो पक्का नाही. त्यातील चुका सर्व काढून आपली शास्त्रे शुद्ध करावी हे चांगले. मूर्खपणाने त्यासच चांगले म्हणून त्याचेंच प्रतिपादन करावे हे नीट नाही; परंतु हे सांप्रतचे लोकांचे मनात येत नाही आणि प्राचीन कालचे लोकांचे शोधापेक्षा आणखी पुष्कळ शोध लागावयाचा आहे तो लावू, अशी इच्छा उत्पन्न झाली, म्हणजे शास्त्री, पंडित, भट जे आता निरुपयोगी आहेत, तेच पुढे उपयोगी होतील; परंतु ही मूर्खपणाची दृढ समजूत लोकांची सोडविण्याची युक्ती व प्रयत्न काय करावा याचा विचार मोठा अवघड आहे. तथापि तो सर्वांनी केला पाहिजे.
 सांप्रत ब्राह्मण लोक भ्रमात आहेत. याजकरिता त्यांची समजूत पाडणे फार अवघड आहे; परंतु कालेकरून पुढची प्रजा जी आहे, तिजमध्ये ज्ञानवृद्धी अधिक होत आहे, त्या योगाने काही समजूत सुटून मोकळे मन करून विचार करतील आणि विचारास प्रतिबंध आहेत, ते मानणार नाहीत. याप्रमाणे हे लोक सुधारल्यावाचून सुखी होण्याचा रस्ता मला दिसत नाही, तेथपर्यंत हे अधिक अधिक भिकारी होतील आणि द्रव्यहीन होतील. हे पुष्कळ मूर्खपणाचे कामास द्रव्य लावतात.
 आमचे श्रीमंत लोक वगैरे अद्याप पुष्कळ आहेत; परंतु त्यांचे या कामात चित्त नाही. ते येथून उठून काशीस जातात आणि शेकडो रुपये धर्मास बरोबर नेतात व देवळे बांधतात; परंतु त्या रुपयांनी जर एखादे कापड किंवा कापूस