पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०८ : शतपत्रे

सांगू लागले, हिशेब करू लागले, ज्योतिषभविष्ये सांगू लागले, यामुळे लोक त्यांस देवासारखे मानू लागले आणि त्या वेळेस राज्य चांगले होते व खावयास पुष्कळ होते, यामुळे ब्राह्मण लोकांस पुष्कळ मिळत होते. पुढे काही राजे बाजीरावासारखे मनास येईल तसे ब्राह्मणांस द्रव्य देऊ लागले, योग्यता पहावयाची सोडली व ब्राह्मणांचे पायाचे तीर्थ घेऊन त्यांस अगदी ईश्वर मानू लागले.
 तेव्हा ब्राह्मणांनी अशी तजवीज केली हीच समजूत लोकांची रहावी व ब्राह्मणांचा अधिकार कधीही मोडू नये, अशी पुराणे व महात्म्ये लिहिली. त्यात येऊन जाऊन गोष्टी, अमुक राजाने अमुक क्षेत्री ब्राह्मणांस अशी तशी दाने केली आणि तो स्वर्गास गेला; म्हणून ब्राह्मणांस अमुक द्यावे, सहस्रभोजन घालावे, त्याच्या मुखांत पडले म्हणजे देवास पोचते. ब्राह्मण काय ते मुख्य; सर्वांनी त्यांस मानावे; हीच मते पुढे प्रबळ झाली; आणि ब्राह्मण वंशपरंपरेचे झाले. लोक म्हणू लागले की, मूर्ख जरी असला, तरी ब्राह्मण जातीचा व ब्राह्मणाचे पोटचा तस्मात त्यांस धर्म करावा. परंतु पहिले असे होते की, मूर्ख ब्राह्मणांची गणना शूद्रांत होती; व उत्तम शूद्र ब्राह्मणांत येत होता. ते जाऊन सर्व ब्राह्मण वंशाचा मान वाढला. तेव्हा अर्थातच ब्राह्मणांनी पाहिले की, आम्हांस मृत्युलोकांचे देवत्व आले, आता विद्या कशास करावी ? नवीन कल्पना कशास काढाव्या ? प्राचीन काळचे देव होते, त्यांचे वंशिक आम्ही, इतकेच म्हणावे म्हणजे पुरे. याप्रमाणे ते बेत करून गावात येऊन राहू लागले, सुख भोगू लागले व फक्त ग्रंथ पाठ करू लागले.
 तत्रापि लोक ही गोष्ट मनात न आणता त्यांस विद्वान मानू लागले; शास्त्री, पंडित व भट हे याप्रमाणे विद्या पाठ करण्यात वेळ घालवू लागले; कोणी व्याकरणी जो होता, तो इतकेच करू लागला की, अष्टाध्यायी सूत्र पाठ म्हणावे व त्यांची टीकाही पाठ करावी. हीच रीती चांगली असे वाटू लागले. जे नवीन ग्रंथ क्वचित काही करणारे झाले, त्यांस तरी असे वाटते की, प्राचीन काळच्या ग्रंथांच्या आधाराने ग्रंथ केले तर चांगले. प्राचीन काळच्या ग्रंथांतीलच गोष्टी कायम ठेवाव्या. नवीन सर्व गोष्टी अपवित्र व पहिल्या सर्व गोष्टी पवित्र व ग्रंथही पवित्र; याप्रमाणे समजूत पडून कोणी विचार करीतनासे झाले.
 यामुळे लोक होते तसे राहिले व नुसते पंडितच राहिले, असे नाही. सर्व कसबी लोक, लोहार, सुतार, तांबट, वगैरेसुद्धा आपले बापाचे कसबात मात्र हात घालतात आणि त्यांचे इतकीच विद्या शिकतात. यामुळे नवीन कल्पना वगैरे काही होत नाहीत. जी रीती पूर्वी तीन हजार वर्षांमागे होती, तीच आहे.