पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १०७

वाटते. यास्तव त्याणी विचार करून याविषयीचा जबाब वास्तविकपणाने द्यावा.

♦ ♦


प्राचीन ग्रंथांचे महत्त्व

पत्र नंबर ८२ : १८ नवंबर १८४९

 सांप्रत हिंदुस्थानातील लोकांचे जे नियम, शास्त्र व समजुती आहेत, त्यांचा गुण असा आहे की, या लोकांचे पाऊल पुढे पडू नये, विद्या होऊ नये व कलाकसबे वाढू नयेत. या प्रकारचे सर्वांचे तात्पर्य आहे. आणि यामुळे आजपर्यंत तीन हजार वर्षांत तसेच झाले आहे. जे सुज्ञ असतील त्याणी विचार करून पहावा की, प्राचीन काळी म्हणजे तीन हजार वर्षांचे पूर्वी मोठे मोठे ऋषिवर्य विचारशील होते. त्यांनी रानात बसून ग्रंथ लिहिले. आकाशात नक्षत्रे पाहून त्यांचे नियम लक्षात आणिले; रानातील औषधी शोधून त्यांचे गुण लक्षात आणले; आणि त्याविषयी शेकडे ग्रंथ लिहिले. तसेच त्याणी भाषेसंबंधी विचार करून व्याकरण लिहिले. स्वयंपाक कसा करतात ते देखील लक्षांत आणून नळपाक व भीमपाक लिहिला. या प्रकारे नाना प्रकारचे ग्रंथ पूर्वी नवीन बुद्धिबळाने उत्पन्न झाले. तत्रापि भूगोलविद्या वगैरे यात त्यांनी बहुत चुका केल्या. अस्तु.
 शोध जे करतात ते चुकले म्हणून त्यात त्यांचा अपराध नाही. त्याप्रमाणे शास्त्र लिहिणारे यांनी पाहिजे तशी न्यायमीमांसा इत्यादी मते वेगळाली लिहिली. त्यानंतर या लोकांस पुढे अवदशेचा पाया येणार म्हणून अशी समजूत पडली की, पहिले ऋषि जाणी हे ग्रंथ लिहिले, ते सर्व देवअवतारच होते व त्याणीं केले तसे मनुष्यजातीच्याने होणार नाही. व आपला धर्म इतकाच की, पूर्वीच्यांनी जे करून ठेवले, तितके मात्र शिकावे; त्याजवर काही नवीन कल्पना काढू नये. काढली तर देवांचा अपमान होतो. व जे काय पाहिजे, ते त्यात सर्व आहे. अशी समजूत पडून लोक अगदी मूर्ख झाले.
 अशी समजूत का पडावी, याची कारणे शोधिली असता अशी सांपडतात की, पहिले पांडवांचे अखेरीपर्यंत ब्राह्मण आपले धर्माचे ठायी रत होते, विद्येविषयी मेहनत करीत होते व उद्योगी होते. आणि दुसरे जातीचे लोक जो विद्वान असेल त्यांस मात्र द्रव्य देत होते. पुढे ब्राह्मणांची विद्या वाढली. ते ग्रहणे