पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०६ : शतपत्रे

तितके विलक्षणपणे अर्थाचे अनर्थ करून दाखवतील व त्यात सद्विचार लक्षात न ठेवता मनास येईल तशी पदे पाडून सरासरी मिळवून देतील; परंतु ही रीती योग्य नाही, कारण जो वाक्य लिहितो त्याचा हेतू असा नसतो. एकाच अर्थाविषयी तो बोध करितो. पंडितांचे विलक्षण अर्थ उपयोगी नाहीत, आणि ते आम्ही मानीत नाही; कारण की, आम्ही लोकांशी बोलतो, तेव्हा सरळ अर्थ असेल तोच दाखवावा. जेव्हा आम्हास पंडितांशी व्याकरण, काव्य, अलंकार यासंबंधी बोलावयाचे असेल, तेव्हा त्याचे अर्थ अमुक होतात, याविषयी वाद करू.
 तूर्त आमचा हा प्रसंग नाही. जसे एकाने एकास मूर्ख असे दुरुत्तर केले आणि तो पुरुष फौजदाराकडे फिर्याद घेऊन गेला, तर फौजदाराने मूर्ख या शब्दाचा कपटी अर्थ किंवा पदे फिरवून किती अर्थ निघतात, ते पहाणे योग्य नाही. ज्या अर्थानि तो शब्द लोकांत प्रसिद्ध आहे, आणि ज्या अर्थाने तो शब्द उच्चारला, तोच अर्थ मनांत आणून शिक्षा करावी. यास्तव 'लोकहितवादी' याने संस्कृत वाक्याचा सरळ व प्रसिद्ध आहे, तोच अर्थ केला. ब्राह्मण लोकांमध्ये क्वचित सूज्ञ आहेत, असे आम्ही समजतो व 'यथार्थवादीत' त्यातीलच एक सूज्ञ आहेत असे आम्ही समजतो, परंतु रीतीचा वाद सोडून त्यांनी पंडिताच्या कोट्या घेऊन वाकडे रस्त्यात शिरू नये.
 (३) रे कलमांत ते लिहितात की, ब्राह्मण जन्मात मात्र मोक्ष आहे व ब्राह्मण या शब्दाचा अर्थ फिरवून लिहितात, त्यासही सदर्हू कलम लागू आहे. 'यथार्थवादी'ने हे पहावे की, सांप्रत गुण, कर्म, स्वभाव येणेकरून युक्त असे ब्राह्मण किती आहेत? आणि जर बहुतांमध्ये हे नाही, तर त्यांस पूर्वापार जे महत्त्व दिले आहे, ते भोगण्यास ते योग्य आहेत की काय ?
 (४) 'यथार्थवादी' यांचे म्हणणे की, पुराणांतील बाष्कळ कथा कल्पभेदाने समजाव्या व विषयपर वचने ज्ञानपर आहेत, परंतु हे ओढूनताणून जबरदस्तीने, सरळ अर्थ सोडून उलटा अर्थ करणे प्रशस्त नाही. एखादी असंभाव्य कथा कल्पांतरीची म्हणून मानिली, तर त्याच अध्यायांत विधिनिषेध येतात, तेही कल्पांतरीचे असे मानले पाहिजे. आणि या प्रमाणे सर्व उडविले म्हणजे या कल्पांतील कोणते विधी याचा मुळीच ठिकाण नाहीसा होईल. त्याप्रमाणे भागवतातील विषयपर कथा असता ज्ञानपर लाविल्या. तर कथेचा ओघ फिरेल आणि संजोग बिघडेल. यास्तव या कोट्या व्यर्थ आहेत, जे उघड अर्थ दिसतात, ते खरे, असे सर्व प्रामाणिक व सूज्ञ कबूल करतील.
 (५) पुराणांत पुष्कळ म्हणी चांगल्या आहेत, हे आम्ही जाणतो; परंतु सर्व निर्बाध आहेत, असे प्रतिपादन करणे 'यथार्थवादी'स योग्य नाही, असे