पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १०५

व त्यांस मोडणारा कोणी मिळाला नाही.
 क्षत्रिय वगैरे राजे होते, ते ब्राह्मणास थोर मानीत, म्हणून ब्राह्मण पाहिजे तसे लिहीत गेले. परंतु त्याजमुळे त्यांचा व लोकांचाही नाश झाला; आणि मूर्खपणा वाढला व विद्या वाढवावयाची राहिली. या लोकांनी जास्ती वाद करू नये, म्हणून प्रयत्न करून ग्रंथ लिहिले. खोटे असले तरी विचार केल्याशिवाय भाव ठेवावा म्हणजे धर्म, असा मूर्खपणा सांगतात. परंतु यातून लवकर सुटतील, तर बरे होईल.

♦ ♦


प्राचीन ग्रंथांचे अर्थ

पत्र नंबर ८१ : ११ नवंबर १८४९

 पुण्यातील तारीख २२ आक्टोबरचे 'ज्ञानप्रकाश' पत्रांत 'यथार्थवादी' याणीं एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्याणी इकडील पत्रांचे उत्तर देण्याचा अनुक्रम चालविला आहे. त्यात ज्या ज्या गोष्टी उत्तर लिहिण्यासारख्या आहेत, त्या खाली कलमवार लिहितो.
 (१) प्रथम — 'यथार्थवादी' आपले पत्राचे प्रस्तावनेत लिहितात की, ब्राह्मण जातीचे सर्व लोक मूर्ख नाहीत, किती एक सूज्ञ आहेत. या मतास आम्ही कबूल आहो. व आम्ही कधी असे लिहिले नाही की, सर्व मूर्ख आहेत; परंतु कोठे सर्व असा शब्द योजला असेल, तरी त्याचा अर्थ हाच की, बहुतकरून शंभरांत किंवा हजारांत एकदोन क्वचित शहाणे असले, तत्रापि इतरांस बोध करू नये, असे होत नाही. ज्यास बोध करावयाचा असतो, त्याने बहुत जण मूर्ख पाहिले, म्हणजे त्यांस सर्व असे म्हणावे लागते. हा एक भाषणाचा अलंकार आहे. तत्रापि एक सूज्ञ असला, म्हणजे बहुत लोकांचे दुर्गुण असतील. ते एक सूज्ञ त्यामध्ये आहे, म्हणून झाकावे असा अर्थ यथार्थवादीचा नसेल, असे वाटते.
 (२) 'यथार्थवादी' एक वाक्याचा आम्ही संग्रह केला, म्हणून त्याविषयी तक्रार करतात; परंतु आम्ही पंडितांसारखे चुकवाचुकव करणारे नव्हे, हे त्याणी समजावे. एक वाक्याचे दोन अर्थ तर काय, परंतु जितके पंडित असतील