पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०४ : शतपत्रे

प्रसिद्ध कराव्या. म्हणजे पाहून आलेल्यांचे वर्तमान लोक खरे मानून पुराणांत खोटे लिहिले आहे, असे समजतील. या प्रकारचा यत्न श्रीमंत लोकांनी करून या लोकांस अज्ञानांधकारातून काढले पाहिजे. आपले लोक केवळ मूर्ख झाले आहेत. राज्यरीती, धर्मनीती व कर्मनीती ही काहीच समजत नाहीत. भट, पंडित व ब्राह्मण हे त्यांचे पदरी मूर्खशिरोमणि असतात; ते नाना प्रकारचे वेडेचार समजावितात. फक्त पुराणांवर भरवसा ठेवून खरे मानतात, याजकरिता प्रत्यक्ष शोध पहावा.
 या लोकांनी असे केल्याशिवाय व ब्राह्मणांचा नाद सोडल्याशिवाय यास धडगती लागणार नाही. श्राद्ध केले म्हणजे बाप तृप्त होतो म्हणून मनापासून खपतात व बायकांस तर असे वाटते की, ब्राह्मण जेवतात हे प्रत्यक्ष पितरच आहेत. वृषोत्सर्ग केला म्हणजे मोक्ष होतो. उसाची नाव केली म्हणजे जो मरतो त्याचे ती उपयोगी पडते. या प्रकारची ब्राह्मणांची फायद्याची कर्मे आहेत. ब्राह्मणांनी जे लिहून ठेविले आहे त्यांत एकही खरे नाही. हा सर्व लबाड नाद आहे. यज्ञयागदेखील ब्राह्मणांनीच निर्माण केले आहेत. अडाणी मनुष्य असला आणि त्याचे पिंडास कावळा शिवला नाही तर त्याचे मनास केवढी खवखव वाटते, आणि किती दुःख होते ? याप्रमाणे मूर्खपण भरले आहे.
 पहा, जर ब्राह्मणांनी असा नियम केला की, जितके पोथीत लिहिले आहे तितके तसेच आचरण करावयाचे, तर त्या ब्राह्मणांची वर्तणूक कशी होईल की, सर्व दिवस त्यांस उद्योग व खटपट पुरवेल. दर्भ व समिधा तोडून आणाव्या आणि होम करावे. तर्पण, दगड, धोंडे नाना प्रकारच्या खटपटी संध्याकाळपर्यंत करता करता त्यांचा जीव थकून तो शेवटी निजतो. याप्रमाणे जन्म घालविणारे ब्राह्मणात अद्यापि आहेत. ते ओवळे होत नाहीत आणि असले ब्राह्मण चांगले म्हणून त्यांस लोक समजतात.
 परंतु मी तर त्यांस मूर्ख समजतो. त्याचे जन्माचा उपयोग काय झाला ? आणि त्याणी सार्थक काय केले ? या खटपटीपासून फायदा ईश्वरही देईल, असे वाटत नाही. दया, धर्म, लोकहित व क्षमा केली, तर मात्र सार्थक होईल. नाही तर तांदूळ शिजविले आणि भात करून तो जाळला व दोन घटका मेहनत करून दर्भाची दोरी केली व ती जाळून होम केला आणि समिधा जाळून यज्ञ केला, तर फायदा कोणत्याही लोकी होणार नाही. मला वाटते की, ही खटपट सर्व ब्राह्मणांनी आपले महत्त्वाकरिता व लोकांस सोंगढोंग दिसण्याकरता लिहिली आहे, किंवा मूर्खपणाने एकाने केली त्याजवर आणखी दोन गोष्टी चढवून दुसऱ्याने लिहिल्या. असे वाढत वाढत आजपर्यंत आले