पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १०३

आमच्या रीती व चाली वाईट आहेत, आमच्या स्त्रिया अज्ञान आहेत. जोपर्यंत आम्ही आपल्या देशात बायकांस शहाण्या करणार नाही, तोपर्यंत आम्ही मूर्ख राहू. कारण की, बायकांचे हाती प्रथम मुलास रीतभात लावणे आहे. तेथेच जर बिबा पडला, तर पुढे सुधारत नाही, लहानपणी जी बुद्धी ती शेवटपर्यंत राहते. याजकरिता बायका शहाण्या पाहिजेत. म्हणजे मुलेही नीट होतात. आणि नवऱ्यास वगैरे स्वकीयांस सुख होते. आणि आळशी खोड्या सोडल्या पाहिजेत.
 भट वगैरे मूर्ख लोकांस फारसा आधार देऊ नये. भट हे जरी अज्ञान आणि मूर्ख आहेत, तरी त्यांस एकदम अन्न घालू नये; असे मी इच्छीत नाही. परंतु त्यांस त्याचे अज्ञान माहीत करावे. भटाची उत्पत्ती मोडावी, वाचण्याकडे लक्ष द्यावे, विद्येचे मूळ वाचणे आहे, याचा विचार करावा. गर्विष्ठपणाने ब्राह्मण लोक बहुधा फुगलेले असतात, तसे असू नयेत. या सर्व गोष्टी जरी खऱ्या आहेत, तरी अद्याप हिंदू लोकांत या गोष्टी खऱ्या म्हणणारे व मानणारे मूर्ख व त्यांस सुधारणे हे अगदीच उपयोगी नाही. ते मेल्याशिवाय त्यांची हरकत दूर व्हावयाची नाही.
 परंतु जे पुढे होतकरू लोक आहेत याणी मनात आणावे की, वृद्ध व म्हातारे यांच्या समजुती आपण घेऊ नयेत. आपण विद्येचे शोधास लागून खरे कोणते व खोटे कोणते ते काढावे; पृथ्वीचा शोध करावा; राज्याचा शोध करावा. ते सोडून ब्राह्मण लोक वगैरे असे आळशी आहेत की, ते विपरीत व विलक्षण गोष्टी सांगत बसतात. कोणी रूमच्या, कोणी स्त्रीराज्याच्या, कोणी रावणाचे तपश्चर्येच्या, कोणी कृष्णाच्या, कोणी शुंभनिशुंभ दैत्यांच्या सांगतात. पण अशा गोष्टींपासून काय फायदा होणार आहे ?
 ज्या कल्याणाच्या गोष्टी आहेत, त्या पाहून नंतर ही पुराणे वाचून टाकीली तर चिंता नाही. परंतु सर्व काळ त्यात काय आहे ? खोट्या गोष्टी म्हणजे चवदा रत्ने व सात समुद्र असे मानणे, केवळ मूर्खपणा आहे. मूर्खपणात दिवस घालवून परिणाम काय ? या गोष्टी इसापनीतीतील गोष्टीप्रमाणे समजून, वाचल्या तर वाचल्या, नाही तर नाही. मुख्य व वास्तविक जे ज्ञान त्याचा शोध करून ते शिकले पाहिजे. पंचम स्कंदांतील भूगोल काढून काय उपयोग ? पुराणिकास तांदूळ मिळतात, म्हणून तो काढतो. परंतु आता या चुका पुरे झाल्या. या चुकांनी लोकांस भ्रांती पडून लोक पृथ्वीचे खरे वर्णन ऐकत नाहीत इतकी दृढ भ्रांती पडली आहे.
 याजकरिता या भ्रांतीतून काढण्यास प्रयत्न करावा व खरी पृथ्वी कशी आहे हे पहावे, व देशांतर करावे, बखरी लिहून आणून त्या छापून लोकांत