पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२ : शतपत्रे

१८६२ च्या सुमारास अहमदाबादेस 'असिस्टंट जज्ज' म्हणून त्यांची नेमणूक झाली व १८६६ साली तेथेच 'ॲक्टिंग स्मॉलकॉज जज्ज' ही जागा त्यांना मिळाली. तेथे ते दहा वर्ष होते. त्यानंतर नाशिकला 'जॉइन्ट सेशन्स जज्ज' म्हणून त्यांना नेमण्यात आले. तेथूनच १८७९ साली ते निवृत्त झाले. १८८० साली त्यांना सरकारने मुंबईत विधिमंडळाचे सभासद नेमले. १८८१ मध्ये 'फर्स्टक्लास सरदार' ही प्रतिष्ठा त्यांना प्राप्त झाली. पुढे रतलाम सस्थानात दिवाण म्हणूनही त्यांनी वर्षभर काम केले. इ. स. १८९२ मध्ये वयाच्या ६९ व्या वर्षी पुण्याला त्यांचे देहावसान झाले.
 लोकहितवादी हे फार मोठे लेखक होते. १८४८ साली त्यांनी आपल्या लेखनास शतपत्रांपासून प्रारंभ केला आणि समाजाच्या मार्गदर्शनाचे हे कार्य त्यांनी आमरण चालविले. 'ज्ञान हे सर्व सन्मानांचे, पराक्रमाचे, बलाचे व ऐश्वर्याचे मूळ आहे.' अशी त्यांची दृढ श्रद्धा होती. म्हणून स्वजनांना शहाणे करून सोडण्यासाठी त्यांनी इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, संस्कृतविद्या इ. अनेक विषयांवर लेखन केले. निवृत्तीनंतर १८८२ साली त्यांनी 'लोकहितवादी' हे मासिक सुरू केले होते. त्यात लोकांना बहुविध विषयांचा प्रौढ लेखांच्याद्वारे परिचय करून देणे हाच हेतू होता. 'स्थानिक स्वराज्यव्यवस्था', 'ग्रामरचना', 'पृथ्वीराज चव्हाण', 'दयानंदांचे चरित्र' ही पुस्तके त्यांनी याच मासिकातून प्रसिद्ध केली. नंतर १८८३ साली त्यांनी ऐतिहासिक विषयाला वाहिलेले असे स्वतंत्र त्रैमासिक चालू केले. त्याचेही नाव 'लोकहितवादी' हेच होते.
 लोकहितवादींचे बरेचसे लेखन भाषांतर, रूपांतर या स्वरूपाचे आहे. त्यांची 'शतपत्रे', 'प्रभाकर' या साप्ताहिकातून १८४८ ते १८५० या दरम्यान प्रसिद्ध झाली. यानंतर इतर वृत्तपत्रांतून त्यांनी बरेच लेखन लिहिले. त्या सर्वांचा संग्रह व 'स्थानिक स्वराज्यव्यवस्था' व 'पृथ्वीराज चव्हाण' एवढेच त्यांचे स्वतंत्र लेखन आहे. इतर लेखन इंग्रजी ग्रंथांच्या आधाराने केलेले आहे किंवा सरळ भाषांतरच आहे. या सर्व लेखसंभारापैकी शतपत्रांनीच त्यांची खरी कीर्ती झाली व आजही 'शतपत्रां'चे लेखक म्हणूनच महाराष्ट्र त्यांना ओळखतो. त्यांचे सर्व क्रांतिकारक मूलगामी विचार प्रामुख्याने शतपत्रांतच आले आहेत. त्यामुळे समाजाने त्यांना दिलेली ही मान्यता वाजवीच आहे.
 लोकहितवादींच्यावर त्यांच्या हयातीतच टीकेचा भडिमार झाला. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी त्यांच्यावर फारच कडक टीका केली आणि शास्त्रीबोवांच्या लेखणीचे तेज फार प्रखर असल्यामुळे काही काळ