पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०२: शतपत्रे

आपल्या मूर्ख समजुती सोडून द्याव्या आणि सर्व लोकांस सारखे मानून विद्या शिकण्याचा सर्वांचा हक्क आहे, हे कबूल करावे. उगेच भांडू नये. अस्तु. याप्रमाणे विद्वानांची अवस्था झाली. दुसरे श्रीमंत जर पाहिले तर, शुद्ध पशूप्रमाणे आहेत. पहा मोठमोठाले लोक किती मूर्ख आहेत, व त्यांस द्रव्य मिळाले म्हणजे असा अभिमान होतो की, मी आपले बापाचे श्राद्ध मोठे करीन, हजारो रुपये उडवीन व मुलाचे लग्न मोठे करीन, याप्रमाणे पैसा श्रीमंत लोक उधळतात. मग त्यांचे पाऊल कसे पुढे पडेल ?
 वर्षश्राद्धास लाखो रुपये खर्च केलेले लोक आहेत. तशीच कार्येही करतात व अहिल्याबाईने सोळा कोट रुपये धर्मादाय केला, तो कोठे आहे? तो जर इतका पैसा शहाणपणाने सार्थकी लावला असता, तर लोक किती शहाणे झाले असते ? व किती आबादानी झाली असती ? या धर्मकृत्याने मूर्खपणा वृद्धिंगत आला, आळस वाढला. मृत्यू चार दिवसांनी यावयाचा असतो. परंतु कुपथ्य केले तर दुसरेच दिवशी येतो. तस्मात् या धर्मकृत्याने सर्वांस वेड लावून मूर्ख केले व श्रीमंत दीनवाणे होऊन रोगी व अविद्वान झाले आणि उद्या बुडाले असते, ते आजच बुडून गेले. अद्यापि लोकांस काय तजवीज करावी, ते समजत नाही. पहिल्याच मार्गाने ते चालत आहेत. ईश्वर जरी प्रतिकूल झाला, तरी अजून हट्ट करतात; परंतु ईश्वरेच्छा प्रमाण.

♦ ♦


कमती कशाची ?

पत्र नंबर ८० : ४ नोवेंबर १८४९

 आमचे लोकांची अद्याप अशी खात्री झाली नाही की, आम्ही मूर्ख आहो, आम्हास विद्या नाही, आम्हास काही कळत नाही, आम्ही गुणाने रिकामे झालो, आपल्या समजुती फार वाकड्या आहेत.
 आम्हास स्वदेशाची, पृथ्वीची, व्यापाराची व कलाकौशल्याची माहितगारी नाही, आम्हास सावधपणा नाही; आमच्या समजुती प्राचीन काळचे ग्रंथाचे आधाराने ज्या पडल्या आहेत, त्या उपयोगी नाहीत; पुराणे वगैरे पोथ्यांत वेड लागावयाच्या गोष्टी पुष्कळ आहेत, त्यापासून भलतीच मते उत्पन्न झाली.