पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : १०१

झाला असे समजतात. असो. याप्रमाणे भट आहेत. आणि शास्त्री, पंडित पाहिले, तर हे भटांपेक्षा मूर्ख व गर्विष्ठ असतात; परंतु यांस काही समजते खरे; समजत नाही असे नाही. तथापि त्यांच्या वाकड्या समजुती व अज्ञान जे प्राचीन काळचे संस्कृत ग्रंथांत भरले आहे. ते त्यांचे मनात येऊन दृढ निश्चय असा झाला असतो की, यापलीकडे विद्या नाही. सर्व जातीचे लोक ब्राह्मणांहून कमी व त्यांच्या भूगोलाविषयी अनर्थकारक समजुती असतात व त्यांचा इतका दृढ निश्चय असतो की, ते बरी गोष्ट ऐकत देखील नाहीत. व त्यांस आणखी विद्या पुष्कळ आहे म्हटले, तर खोटे वाटते. मागील सर्व ग्रंथकर्ते देव होते; म्हणून आता ग्रंथ करणे प्रशस्त नाही, असे त्यांस वाटते.
 नवीन रीती व नवीन विद्या पढणे याचे ते शत्रू असतात. पहा की, पाच हजार वर्षांमागे जी रीती, आणि जे ग्रंथ संस्कृत पढावयाचे असतील, तेच आता आहेत. त्यांची सुधारणा त्याजला नको व अक्कल तर्क आणि शहाणपण ही त्यांस कमी असतात व प्राकृत भाषा त्यांस तुच्छ वाटून प्राकृतात हे काही कधी लेखणी उचलीत नाहीत. पोथ्याची वेष्टणे प्राचीन काळाप्रमाणेच आहेत, ती आवडतात. प्राकृत भाषा सर्व लोकांची आहे. याजकरिता प्राकृत ग्रंथ असल्याखेरीज उपयोग नाही, हे मनांत आणीत नाहीत व शूद्र व इंग्रज वाचतील, हे त्यांस भय असते. व्याकरण हे कोणी वाचू नये, वेद कोणी नीच जातीने वाचू नयेत, असे वचन आहे, त्याजवर सर्व आणतात. भारतही वाचू नये म्हणतात; कारण की, "भारतः पंचमो वेदः" अशी नाना प्रकारची कुत्सित वाक्ये बोलून विद्येची दुर्दशा करतात.
 आणखी एक शास्त्री लोकांस सांगा की, कैकाडी वगैरे नीच जातीचे लोक आहेत, त्यांस चांगले लोक करण्याकरिता अमुक एक तजवीज चालवावी, म्हणजे त्यांचा प्राण जाईल, आणि ते म्हणतील की, जे तुम्हांस द्यावयाचे असेल, ते ब्राह्मणांस द्या. यात मोक्ष आहे. नीचास धर्म करणे अशास्त्र आहे. त्यांस ईश्वराने नीच जातीत जन्म दिला. त्यांनी त्यातच रहावे असे सांगून कधी चांगले कामास मदत करावयाचे नाहीत व ब्राह्मणांचा मान वाढवतील. इंग्रजी राज्य झाले, हे एक ब्राह्मणांचे महत्त्व नाहीसे होण्यास मूळ झाले आहे, यात संशय नाही. ब्राह्मणांनी बहुत वर्षेपर्यंत थोरपणा व अधिकार भोगिला. ब्राह्मणांचा मंत्राने मुक्ती व वचनाने शुद्धी होत होती. तेच लोक खरे मानीत होते; परंतु तो काळ गेला. बरे झाले की, लोक आता पाहू लागले.
 ब्राह्मण व आपण कोण, यात अंतर काय ? ब्राह्मणास वीस हात आहेत की काय ? किंवा आपल्यास काही कमी आहेत काय ? अशा समयी ब्राह्मणांनी