पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ९९

नाही. जे चिंतू ते मिळेल, ही समजूत विसरावी. असे मागे कधी झाले नाही व पुढेही होणार नाही. पुराणांतल्या गोष्टी पुराणांत ठेवाव्या. भलतेच अर्थ मूर्ख पुराणिक असतात ते करतात, व भलतीच समजूत पाडितात.
 

याजकरिता सांप्रत इंग्रजीत ज्या ज्या विद्या भूगोल, खगोल, राज्यनीती इत्यादीक आहेत, त्यांचा विचार करावा व त्यातील समजुती करून घ्याव्यात, म्हणजे तुम्हास फार संतोष होईल. असे केल्याशिवाय लोकांस कोणतेही कार्य नीट करता येणार नाही. सरकारने लोकांस मोठी कामे दिली, तर ते अनर्थ व जुलूम करतील, लाच खातील, डौल करतील व लोकांचे कल्याणार्थ झटावयाचे नाहीत. याचे प्रत्यंतर सांप्रत जे लोक रोजगारावर आहेत, त्यांजकडे पाहिले म्हणजे मिळेल.
 तात्पर्य, ज्यांस ईश्वराचे भय नाही व विद्या काय हे ज्यांनी ऐकलेही नाही, त्यांस नीती येईल कोठून ? व शहाणपणही कसे येईल ? बहुत लोक संध्या झाल्यावर स्तोत्रपठण करतात, परंतु केवळ सडकेवर माती वाहण्याची मजुरी आणि स्तोत्रपाठ सारखाच आहे; कारण की त्यात अर्थ नाही. पाठ करण्याने पुण्य होते, असे समजून व्यर्थ आयुष्य कशास घालवितात?

♦ ♦


पाठ करण्याची चाल

पत्र नंबर ७७ : ३० सप्टेंबर १८४९

 श्रीमंत आणि विद्वान या दोन लोकांच्या हातून लोकांचे व देशाचे सुधारणेकरिता प्रयत्न व्हावयाचे. या दोघांशिवाय कोणी करणार नाही. एक श्रीकडून बलवान आणि दुसरे ज्ञानेकरून बलवान.
 परंतु आमचे देशांत या दोघांची अवस्था पाहून मला फार शोक होतो. पूर्वीचे श्रीमंत आणि विद्वान असे नव्हते, असे मागील पुस्तकी पाहता समजते. त्याकाळी त्यांनी चांगली व उत्तम प्रकारची पुस्तके लिहिली असे नाही; परंतु त्या लोकांचा जिकडे बुद्धिप्रवाह होता, तिकडे त्यांनी लिहिण्यास कमी केले नाही. पूर्वी ग्रंथ मोठाले झाले आहेत. याजवरून विद्येस उत्तेजन आणि बक्षिसी मोठी मिळत असेलसे ठरत आहे.