पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९८ : शतपत्रे

एक ग्रंथ पढलेला आणि जितके संस्कृत किंवा इतर भाषेत ग्रंथ आहेत, ते सर्व जमा केले, तर त्या एकाची बरोबरी व्हायची नाही, असे आहे; कारण इंग्रज लोकांनी विद्या फार सुधारल्या, याजमुळे त्या शुद्ध आहेत, आणि पूर्वीच्या काळी शोध कमी होते. याजमुळे विद्या अर्धवट झाल्या, तितक्या राहिल्या आहेत, केवळ संस्कृतानेच मनुष्य शहाणा व ज्ञानी होईल, असे नाही. शास्त्रे इत्यादीक पढले आहेत, त्यांच्या बहुत वाकड्या समजुती आहेत. व हे एक संस्कृताचे धोरण आहे. आणखी बहुधा पाहण्यात आहे की, संस्कृत पढलेले भ्रमिष्ट, मताभिमानी, अर्थाचे अनर्थ करणारे आणि वाकड्या रीतीने भलतेच दृष्टांत देऊन विचार करणारे असे असतात. जुन्या काळच्या विचाराच्या रीती अलीकडे अगदी काढून टाकल्या आहेत. व सुमार्गाने विचार करण्याच्या पद्धती व नेम लावून शास्त्रे केली आहेत. ती इंग्रजीत आहेत; पण ती संस्कृतापेक्षा हजारपट चांगली आहेत. हे मी निष्पक्षपाताने सांगतो.
 आता आमचा स्वधर्म संस्कृतात आहे, याजकरिता त्याचे ज्ञान असणे जरूर आहे. परंतु तितक्यापुरतेच संस्कृत शिकावे. त्यातील शास्त्रे पाहणे किंवा त्याजवर फार विश्वास ठेवणे, उपयोगी नाही. बुद्धीस विपर्यास येतो. त्यापेक्षा एखादा इंग्रजी ग्रंथाचा तर्जुमा पाहून विचार केला, तर कार्य होईल व ते संस्कृतद्वारा पाचपट आयुष्य खर्च करून होणार नाही. शहाणपण ही फार दुर्लभ वस्तू आहे. बहुत वाचले पाहिजे, बहुत गोष्टींचा विचार केला पाहिजे, व बहुत ऐकले पाहिजे.
 अलीकडेस माझ्या पाहण्यात काही पोरे आली आहेत. त्यातील कितीएकांस इंग्रजी जरा वाचता लिहिता येऊन पोट भरू लागले, म्हणजे त्यांस वाटते की, आम्ही परिपूर्ण झालो. तसेच संस्कृत पढलेले पुष्कळ आहेत. त्यांच्या तर विलक्षण समजुती असतात. मुख्य त्यांचे मनाची अशी स्थिती असते की, ज्या ज्या मूर्खपणाच्या समजुती म्हणजे प्रारब्धावर विश्वास व ज्योतिषावरून दैव पाहणे व मंत्रांचे सामर्थ्य वगैरे त्यांस खरे वाटते. हा सर्व मूर्खपणा संस्कृत विद्येत भरला आहे. जो पढतो त्यांस त्या पिशाच्चाप्रमाणे लागतात. याजकरिता ही मोठी सावधगिरी ठेवली पाहिजे.
 आजचे काळी इंग्रजांसारखे शहाणे, पराक्रमी, ऐश्वर्यवान व विद्वान कोठे नाहीत. व त्यांच्या विद्या हिंदूंस अश्रुत आहेत. याजकरिता सर्वांनी त्यातील ज्ञान घ्यावे व त्याचा धिक्कार करू नये. आम्ही ब्राह्मण सर्वांहून श्रेष्ठ, आम्ही भूदेव, या म्लेंच्छांनी आम्हापुढे काय शेखी मिरवावयाची आहे ? व यांचा पदार्थ काय? आमचे नशीब अनुकूल होईल, तेव्हा आम्हास विद्या लागणार