पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शतपत्रे : ९५

ती जेव्हा देवळात जळाली, तेव्हात त्या उंदरास न्यावयास विमान आले. त्याने पुसले का ? तेव्हा देवदूत म्हणाले की, तुझ्या पुच्छाने धाग्याने एक वात झाली; ती आज देवळात जळाली; त्याचे श्रेय तुला आले. म्हणून हे विमान तुला आणले आहे. याजकरिता वाती लावतील त्यांस मोक्ष होतो.
 तसेच वांग्याचे धुराने विमान पडल्याची कथा आहे. इत्यादी लक्षावधि कथा आहेत; परंतु त्यांचा खरा अर्थ सोडून लोकांनी त्या गोष्टीच खऱ्या मानिल्या आहेत. आणि बायका ऐशी वर्षेपर्यंत वाती करतात; आणि जाळितात. दुसरा काही उद्योगच नाही. हा मूर्खपणा पुराणांचे गोष्टींनी शिरला. जर पुराणे करणारांनी खूळ लावावयाच्या गोष्टी न लिहिता साधेपणाने सांगितले असते की, गरिबांस धर्म करावा; अंधेर असेल तेथे दिवा लावावा; परंतु असे न सांगता त्यांनी दर एक कलमास मोक्ष आणि स्वर्ग सांगितला आहे.
 त्यांस असे दिसते की, या गोष्टी लिहिणारास पुढे लोक मूर्ख होतील या गोष्टी सर्व खऱ्या म्हणतील, असे वाटले नव्हते; परंतु तशी गोष्ट झाली. आता पुराणिकबाबांच्या गोष्टी ऐकणारे ज्ञानी पुरुष नाहीत; परंतु बायका व पुरुष खुळे, वेडे, अज्ञान, मूर्ख ज्यांस काहीच समजत नाही, असे बसतात आणि सर्व गोष्टी खऱ्या म्हणतात. येणेकरून लोक मूर्ख झाले आहेत.
 'याजकरिता या सर्व पुराणांतील कोणी रहस्य काढून नवीन ग्रंथ लिहिला तर फार हित होईल. उनाड गोष्टींनी लोकांस भ्रांतीत घालणे हे योग्य नाही. आणि वास्तविक पाहिले तर धर्मशास्त्र, वैद्यशास्त्र व ज्योतिषशास्त्र ही सर्व प्राचीन काळी लिहिली गेली, आणि सांप्रत काळास फरक पडला आहे, त्याजमुळे धर्मशास्त्र जे फेरफार करावयाचे ते केले पाहिजेत. जसे ज्योतिष काळेकरून चाळावे लागते, तेव्हा त्यांस मेळ पडतो; आणि वैद्यक ही शास्त्रांत एक आहे आणि कृतीत वेगळेच असते. वैद्य चार रोगांची औषधे जाणतो; परंतु जर एका मनुष्यास चार रोग झाले, तर त्याने कल्पना बसवून योजना केली पाहिजे. आणि हजार औषधे एका रोगास लिहितात; परंतु वैद्याने प्रसंग पाहून दिले पाहिजे.
 तसेच धर्मशास्त्र अनेक मते आहेत व पुराणांत अनेक गोष्टी आहेत; परंतु लोकांची स्थिती पाहून व तारतम्य पाहून त्यांचे रहस्य जाणावे. केवळ अर्थाचा अनर्थ करू नये; परंतु हे लोक शुद्धीवर नाहीत. अगदी भकले आहेत. त्यांस शिकवणारा शंकराचार्य कोण ? ईश्वर करील ते करो, परंतु लोक फारच अज्ञान झाले. धर्म म्हणजे काय, विद्या म्हणजे काय, हे अगदीच जाणत नाहीत. मोडक्या घराचे कुजके वासे राहतात, तसे हिंदू धर्म शास्त्र व विद्-प्राचीन काळचे