पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण तिसरें : ८९

मंत्रिपदावर आरूढ होण्याच्या खटपटीत असत व कधी कधी यशस्वी होत. त्यांच्या मारामाऱ्यांना काँग्रेस हाय कमांडचे लोकहि विटून गेले आहेत, पण दोघांनाहि काँग्रेसमध्ये उत्तम थारा मिळालेला आहे. कोणालाहि हाय- कमांडने हाकलून दिलेलें नाहीं, कारण या जातीयतेचा आश्रय घेतला नाही तर सत्ता मिळणें अशक्य आहे. हे जाणून अगदी नाइलाजाने राष्ट्रवादी कांग्रेस-हायकमांडने हा विषाचा घोट गिळला आहे. बिहारमध्ये कम्युनिस्ट लोकहि प्रचाराला निघतांना जानवें घालून, गंध लावून बाहेर पडतात. कारण त्यांचा नाइलाज आहे. तसें केलें नाही तर त्यांना कोणी जवळ उभेच करणार नाही. एवंच सर्वांचा नाइलाज आहे.
 सत्तेसाठी काँग्रेसने अनेक प्रदेशांत जातीयवादाचा आसरा घेतला आहे. मद्रासमध्ये द्रविड कझगम पंथाचे लोक कोणत्या लीला करीत आहेत तें प्रसिद्धच आहे. हिंदूंच्या सर्व देवतांची ते विटंबना करतात. गांधींच्या प्रतिमा जाळतात. भारताने मान्य केलेल्या घटनेच्या प्रतीचें दहन करणें हा त्यांचा जाहीर कार्यक्रम होता, आणि भारताची शकले करून कझगमस्थान निराळें केलें पाहिजे अशा जाहीर घोषणा ते करूं लागले आहेत. असें असूनहि त्यांच्याशी काँग्रेसजनांची वागणूक अत्यंत प्रेमळपणाची, मायेची, आपुलकीची आहे. कामराज नाडर सारखे कॉँग्रेसश्रेष्ठी द्रविड कझगम- नेत्यांबरोबर एका व्यासपीठावरून प्रचार करतात. कझगम- नेत्यांनी अगदी अनन्वित अत्याचार केले तरी त्यांना शिक्षा सौम्य व सुखदायक अशाच होतात. त्यांच्या एका नेत्याने भर न्यायालयांत "तुम्ही नेहरूंच्या दडपणामुळे मला शिक्षा देत आहांत" असा न्यायाधीशावर आरोप केला, पण तो न्यायालयाचा अपमान मानण्यांत आला नाही. याची कारणें उघड आहेत. निवडणुकांत त्यांचें साह्य घेऊन काँग्रेसला सत्ता जिंकावयाची असते. तेव्हा त्यांच्याशी कठोर वागून कसें बरें चालेल ? हेंच धोरण सर्वत्र आहे. ओरिसाच्या गणतंत्र परिषदेत जुन्या सरदार जमीनदारांचा भरणा आहे, जुन्या संस्थानिकांचे तेथे वर्चस्व आहे. परिषद् अत्यंत प्रतिगामी, सुधारणाविरोधी आहे अशी काँग्रेसश्रेष्ठींनी तिच्यावर अनेक वेळा टीका केली आहे, पण सत्ता हातची जाते असें दिसतांच काँग्रेसश्रेष्ठींनी त्या जातीयवादी, प्रतिगामी परिषदेशी हातमिळवणी करण्याचा हरेकृष्ण मेहताब यांना