पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८८ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

गुंडमवाल्यांचें राज्य प्रस्थापित झाले आहे. सत्ता, बल, सामर्थ्य यांची विषमता इतक्या विकोपाला गेली आहे की, तेथे जीवनहि असुरक्षित झालें आहे, आणि सत्तेच्या विषमतेबरोबर धनाची विषमता अपरिहार्यपणेंच येत असते हें सांगण्याची गरज नाही.

जातीयतेचें विष

 या दोन विषांनी समाजाचे स्वास्थ्य पुरेसें नष्ट होत नाही. म्हणूनच की काय जातीयतेचें विष, हें कालकूट आता उफाळून वर येत आहे. स्वातंत्र्यापूर्वी याचा प्रभाव दिसतच होता. पण राष्ट्रनिष्ठेने, स्वातंत्र्याच्या ध्येयवादाने तें महाविष जरा दबून राहिलें होतें, आणि आशा अशी होती की, स्वातंत्र्यानंतर सत्ता हाती आली की, जातीयतेचा समूळ नायनाट करणे सहज शक्य होईल. पण येथे अगदीच विपरीत घडलें. सत्तेच्या साह्याने जातीयता नष्ट करण्याचें दूरच राहून जातीयतेच्या साह्याने सत्ता टिकवून धरावी हा सोपा मार्ग भारतांतील राजकीय पक्षांनी अवलंबिलेला आहे, आणि दुर्देवाने काँग्रेस ही सर्व क्षेत्रांत जशी अग्रभागी उभी आहे तशीच येथेहि ती अग्रभागीच आहे.
 बिहारमध्ये जातीयता कोणत्या थराला गेली आहे हें पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुढील उद्गारांवरून ध्यानांत येईल. 'जातीयवादाचें हिडीस स्वरूप बिहारमध्ये दिसून येतें तितकें अन्यत्र कोठेच आढळत नाही. येथील जातीयतेच्या विषाची बाधा आम्हांला दिल्लीपर्यंत त्रस्त करीत असते. मी येथे आलों तो भूमिहर, रजपूत या जातींना भेटण्यासाठी आलो नाही. भारताच्या नागरिकांना मला भेटावयाचे आहे. तुम्ही हें पक्के ध्यानांत ठेवा की, जातीयवादी लोकांना कांग्रेसमध्ये कधीहि थारा मिळणार नाही.' १९५२ साली, १९५४ साली सर्वोदय संमेलनाच्या वेळी आणि इतर अनेक वेळी पंडितजींनी असेच वैतागून उद्गार काढले आहेत. पण चमत्कार असा की, जातीयतेचा हा विषार मुळीच हटत नसून काँग्रेसमध्येहि तो बळावत चालला आहे. बिहारमध्ये भूमिहर व रजपूत या जाती प्रमुख असून श्रीकृष्ण सिंह हे पहिलीचे आणि अनुग्रहनारायण सिंह हे दुसरीचे पुढारी होते. हे दोघेहि पक्के जातीयवादी असून आळीपाळीने बिहारच्या मुख्य