पान:लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८६ : लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान

तिच्यावरच ठपका आला. ती बडतर्फ व्हावयाची, पण जॉन विल्यम्स यांनी तिला वांचविलें. राजकारणाचें स्वरूप सर्वत्र सारखेच, असा याचा अर्थ. ही सत्ता व धन यासाठी केलेलीं कारस्थाने असतात. सत्तावाल्यांना धन हवें असतें व धनवाल्यांना सत्तेचा पाठिंबा व संरक्षण हवें असतें; आणि यांच्या युतींतून राजकारण निर्माण होत असतें. निरनिराळ्या मार्गांनी सत्ता व धन मिळविणें हें राजकारणी लोकांचें उद्दिष्ट असतें. बिहारमध्ये काँग्रेसचे २२ लाख सभासद झाले. पुढे असे आढळले की, यांतील १० लाख खोटे आहेत. बिहारचे शिक्षणमंत्री श्री. वर्मा आपल्या अहवालांत लिहितात की, एका ऑफिसांत बसून एकाच माणसाने शेकडो सह्या केल्या व अंगठे उठविले. खंडूभाई देसाई यांनी त्यावर भाष्य केले की, भूमिहर, ब्राह्मण व रजपूत या भिन्न जातींमध्ये सत्तेसाठी तीव्र स्पर्धा आहे. त्यामुळे सत्ताप्राप्तीसाठी प्रत्येक जातीने आपापले जास्त सभासद नोंदविले. म्हणजे सत्तालोभ व धनलोभ यांना येथे जातीयता येऊन मिळाली. राजकारणाला आणखी एक रंग चढला, पण येथेच हे थांबेल असे नाही. अमेरिकन राजकारणाला अत्यंत हिडीस व भयानक रूप आले आहे तें या मूळच्या गटांना डाकू, ठग, पेंढारी, मवाली हे येऊन मिळाल्यामुळे हा प्रकार भारतांत चालू झाला आहे, हें अन्यत्र मी दाखविलें आहे. (वसंत दिवाळी अंक १९५८ 'आपल्या लोकशाहीवरील नवें संकट') म्हणून त्याचा तपशील येथे देत नाही. येथे इतकें सांगितलें म्हणजे पुरें की, भारतांतील कांही राज्यांतील विधानसभांचे सदस्य एकमेकांवर 'या राजकीय पक्षांचा गुन्हेगारीला आश्रय असतो' असे आरोप करीत आहेत. मध्यप्रदेशांत तर भरसभेत विरुद्ध पक्षीय सदस्यांवर कांही सभासदांनी असे आरोप केले, आणि आम्ही पुरावे देतों, असे आव्हान देऊन सांगितलें.

लोकशाहीचें कर्मकांड

 आपली भारताची लोकशाही समर्थ होईल काय, दण्डसत्तांनी उद्या आक्रमण केलें तर आपला निभाव लागेल काय, याचा आपण विचार करीत आहो. आम्ही लोकशाही मूल्यें कदापि सोडणार नाही, अशी आपली प्रतिज्ञा आहे. पण आपण हें ध्यानांत ठेविलें पाहिजे की, विवेक, नीति, धर्म यांची